Maharashtra Cold Wave : उत्तर भारतातून वेगाने महाराष्ट्राकडे सरकत असलेल्या थंडगार वाऱ्यांमुळे पुढील दोन दिवसांत राज्यात थंडीची तीव्र लाट (Cold Wave) येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागांत थंडीचा कडाका वाढणार असून, 14 जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
10 डिसेंबर आणि 11 डिसेंबर रोजी धुळे आणि जेऊर (Jeur) येथे 6°C इतक्या कमी तापमानाची नोंद झाली, तर काही भागांत पारा 5.5°C पर्यंत खाली आला आहे.
राज्याच्या विविध भागांतील तापमानाची सद्यस्थिती
राज्याच्या अनेक भागात किमान तापमानात मोठी घट झाली आहे, ज्यामुळे थंडीचा जोर जाणवत आहे.
- पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात थंडीची लाट अधिक तीव्र झाली आहे. पुणे शहराचे तापमान 7.9°C वर घसरले असून, ही यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद आहे. विशेष म्हणजे, पुण्यातील हे तापमान महाबळेश्वर पेक्षाही कमी आहे. बारामतीमध्ये 7.5°C तापमानाची नोंद झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि निफाडमध्ये थंडीचा मुक्काम कायम आहे. निफाडमध्ये 6.1°C, तर नाशिकमध्ये 8.2°C आणि मालेगावमध्ये 8.8°C तापमानाची नोंद झाली आहे. अहमदनगरमध्ये किमान तापमान 6.6°C इतके नोंदवले गेले आहे. - मराठवाडा आणि विदर्भ
मराठवाडा आणि विदर्भातही गारठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मराठवाड्यात परभणीचे तापमान सर्वात कमी 5.5°C इतके नोंदवले गेले. तसेच, छत्रपती संभाजीनगरमध्ये 8.8°C तापमानाची नोंद झाली. विदर्भात थंडी कायम असून, नागपुरात 8.1°C तर गोंदियामध्ये 8.4°C तापमानाची नोंद झाली. या मोसमातील ही दुसरी निचांकी तापमान पातळी आहे. भंडारा आणि बुलढाणा येथे अनुक्रमे 12°C आणि 12.2°C तापमान नोंदवले गेले. सर्वात थंड ठिकाण म्हणून अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा (Chikhaldara) येथे तापमान 3°C पर्यंत खाली घसरले आहे. - मुंबई आणि कोकण
मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरही नेहमीपेक्षा हवामान थंड आहे. मुंबईतील सांताक्रूझ येथे किमान तापमान 15.6°C नोंदवले गेले. कोकणातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे दापोली (रत्नागिरी) येथे थंडीची लाट पसरली असून, तापमानाचा पारा 7.0°C वर आला आहे. उत्तर रत्नागिरीतील चिपळूण, गुहागर आणि खेडमध्ये देखील प्रचंड थंडी जाणवत आहे.
हवामान विभागाचा इशारा आणि पुढील अंदाज
भारतीय हवामान विभागाने नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर सह एकूण 14 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात पुढील तीन दिवसांत हळूहळू 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर लगेचच पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
प्रशासनाचे आवाहन
थंडीच्या तीव्र लाटेमुळे प्रशासनाने नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आरोग्यविषयक समस्या असलेल्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी. अनेक ठिकाणी नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीचा आधार घेत आहेत. विधिमंडळ परिसरातही सकाळच्या सत्रात तीव्र थंडीचा सामना करताना, अनेक लोक उन्हामध्ये उभे राहणे पसंत करत होते.
हे देखील वाचा – Ladki Bahin Yojana : पुरुषांना लाभ आणि 26 लाख बोगस लाभार्थी आरोप; ‘लाडकी बहीण’ योजनेत गोंधळ उघड! अपात्रांकडून वसुली सुरू









