MAHAGENCO-Rosatom MoU | महाराष्ट्र सरकारने अणूऊर्जेच्या नव्या पर्वाची सुरुवात करत रशियाच्या सरकारी कंपनी ‘Rosatom’ सोबत थोरियम इंधनावर आधारित लहान मॉड्युलर अणुभट्टी (Small Modular Reactor – SMR) विकसित करण्यासाठी सामंजस्य करार (MoU) केला आहे. हा करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘MAHAGENCO’ आणि ‘Rosatom’ यांच्यात झाला.
महाराष्ट्र सरकारने अणूऊर्जा क्षेत्रात पहिल्यांदाच थेट सहभाग घेतला असून, यापूर्वी हे क्षेत्र केवळ केंद्र सरकारच्या (Department of Atomic Energy) अखत्यारीत होते. हा करार थोरियम इंधनाच्या वापरातून स्वच्छ, सुरक्षित आणि टिकाऊ ऊर्जा उत्पादनाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
‘मेक इन महाराष्ट्र’ अंतर्गत थोरियम SMR चं संयुक्त विकास
करारानुसार, थोरियमवर आधारित SMR चा महाराष्ट्रात संयुक्तपणे विकास केला जाईल, त्याचे व्यापारीकरण केले जाईल आणि ‘Make in Maharashtra’ उपक्रमांतर्गत त्यासाठी असेंब्ली लाइनही उभारली जाईल. हा प्रकल्प अणुऊर्जा नियामक मंडळाच्या (AERB) सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांनुसार राबवला जाणार आहे.
MITRA आणि Rosatom यांच्यासह संयुक्त कार्य गट स्थापन
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी MAHAGENCO, Rosatom Energy Projects, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA) आणि Global Technology Alliance यांच्या सहभागातून एक संयुक्त कार्यगट स्थापन केला जाणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत ‘X’ (Twitter) वर माहिती दिली.
सध्या भारतात थोरियमवर आधारित कोणतीही कार्यरत अणुभट्टी अस्तित्वात नाही. मात्र, देशाने अणुऊर्जेच्या तीन टप्प्यांतील धोरणानुसार थोरियमचा वापर अंतिम टप्प्यात इंधन म्हणून करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 2003 मध्ये केंद्र सरकारने प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर (PFBR) साठी ‘BHAVINI’ ची स्थापना केली होती.