Ambadas Danve Video : सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू असतानाच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक्स हँडलवर तीन व्हिडिओ शेअर करून मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे.
या व्हिडिओमध्ये सत्ताधारी पक्षांचे आमदार नोटांच्या गड्ड्यांसह दिसत असल्याचा अप्रत्यक्ष दावा दानवेंनी केल्यामुळे अधिवेशनात यावर तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
दानवेंचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना थेट सवाल
अंबादास दानवे यांनी ही पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट प्रश्न विचारला आहे.
दानवे म्हणाले की, “या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?”
या तीन व्हिडिओंपैकी दोन व्हिडिओंत मोठ्या प्रमाणावर नोटांची बंडले दिसत आहेत, तर तिसऱ्या व्हिडिओमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्यासारखी दिसणारी एक व्यक्ती दिसत आहे.
या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे!
— Ambadas Danve (@iambadasdanve) December 9, 2025
जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?@mieknathshinde @Dev_Fadnavis @AmitShah @BJP4Maharashtra #Moneypower #ruins #Maharashtra pic.twitter.com/WUDpmedTgo
तक्रार करणार आणि चौकशीची मागणी
या व्हिडिओबाबत बोलताना अंबादास दानवे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “सत्ताधारी पक्षातील काही आमदार त्यात दिसत आहेत. मोठ्या नोटांच्या गड्ड्या त्यात दिसून येत आहेत. त्या कोणाच्या आहेत, काय आहेत हे तपासले पाहिजे. मी यात कोणाचे नाव घेत नाही, पण पोलिसांनी हे शोधले पाहिजे. मी याबाबत तक्रार करणार आहे.”
महेंद्र दळवींचे प्रत्युत्तर
व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती आपणच असल्याच्या चर्चांवर महेंद्र दळवी यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
महेंद्र दळवी म्हणाले, “अंबादास दानवेंनी तो व्हिडिओ नीट दाखवावा. लाल टी-शर्टमधील व्यक्ती कोण, हे त्यांनी सांगावे. मी व्हिडिओत असेन तर मी आमदारकीचा राजीनामा देईन. ब्लॅकमेल करणे हा अंबादास दानवेंचा धंदा आहे. त्यांना कोणी सुपारी दिली हे त्यांनी सांगावे. त्यांनी व्हिडिओ मॉर्फ केला आहे. पुरावे घेऊन हा व्हिडिओ माझाच आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवावे. त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही.”
भरत गोगावलेंची प्रतिक्रिया
यावर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया देताना, अंबादास दानवेंच्या हेतूवर शंका व्यक्त केली आहे. भरत गोगावले म्हणाले की, “त्यात आमदार कोण आहे आणि किती बंडलं आहेत, हे आम्ही आतापर्यंत पाहिलेले नाही. अंबादास यांच्याकडे काही शोध मोहीम आहे का? आम्ही सत्ताधारी आहोत. तीन पक्षांमधील कोण आमदार आहे? काय आहे? हे कसले पैसे आहेत? हे तरी कळायला हवे. अंबादास दानवेंकडे सध्या कोणतेही पद नाही. त्यामुळे कदाचित त्यांची शोध मोहीम सुरू असेल.”
हे देखील वाचा – मध्यमवर्गीयांसाठी खास! 5 स्टार सेफ्टी रेटिंगसह ‘ही’ SUV आहे देशातील सर्वात स्वस्त; किंमत 5.50 लाखांपासून सुरू









