Mahindra & Mahindra Chakan Plant | महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनीने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना महाराष्ट्रातील चाकण (Chakan) येथे नवीन उत्पादन प्लॅटफॉर्म सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. या नवीन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वर्षाला 1.2 लाख यूनिट्सचे उत्पादन केले जाईल.
चाकण येथील या नवीन उत्पादन केंद्राची सुरूवात 15 ऑगस्टला होईल. कंपनीने यंदाच्या F26 आर्थिक वर्षात ‘XUV 3XO’ आणि ‘थार रॉक्स’ (Thar Roxx) या मॉडेल्सच्या उत्पादनात 3,000 युनिट्सची वाढ केली आहे.
तसेच, महिंद्रा 2028 नंतरच्या काळात नवीन एसयूव्हींसाठी (SUVs) एक ग्रीनफिल्ड प्लांट उभारण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान, सोमवारी जाहीर झालेल्या तिमाही निकालांमध्ये कंपनीचा नफा विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा कमी नोंदवला गेला. नवीन इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicles) निर्मितीसाठीच्या एकवेळच्या खर्चामुळे आणि उत्पादन खर्चातील वाढीमुळे नफ्यावर परिणाम झाला. कंपनीने जानेवारी ते मार्च या कालावधीत ₹24.37 बिलियन नफा नोंदवला.
महिंद्रा भारतातील अव्वल SUV उत्पादक असून ट्रॅक्टर विक्रीतही अग्रणी आहे. या तिमाहीत कंपनीच्या एसयूव्ही विक्रीत 18%, तर ट्रॅक्टर विक्रीत 23% वाढ झाली. वाढलेल्या कृषी उत्पन्नामुळे ट्रॅक्टर विक्रीला गती मिळाली, तर नवीन ‘XUV 3XO’ आणि ‘फाईव्ह-डोअर थार’ (Five-door Thar) या मॉडेल्समुळे SUV विक्रीत भरघोस मागणी दिसून आली.
कंपनीने याच तिमाहीत आंतरराष्ट्रीय ट्रॅक्टर व्यवसायाशी संबंधित 6.45 अब्ज रुपयांचा एकवेळचा खर्च नोंदवला असून यासंदर्भात अधिक तपशील अद्याप दिलेले नाहीत.
महिंद्राच्या ऑटोमोटिव्ह व्यवसायातून मिळणारा महसूल – जो कंपनीच्या एकूण महसुलाच्या सुमारे तीन चतुर्थांश हिस्सा आहे, तो 25% नी वाढून ₹24.98 अब्ज झाला आहे. यामध्ये SUV, ट्रक आणि बस विक्रीचा समावेश आहे.
कंपनीच्या कृषी व्यवसायात, जो तुलनेने लहान परंतु अधिक फायदेशीर आहे, महसूलात 23% आणि करपूर्व नफ्यात 51% वाढ नोंदवण्यात आली आहे. एकूण महसूल 25% नी वाढून ₹313.53 अब्जवर पोहोचला आहे.