Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

Ladki Bahin Yojana April installment

Ladki Bahin Yojana April installment | मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या (Ladki Bahin Yojana) एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असलेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. एप्रिल महिना संपूनही हप्ता जमा न झाल्याने अनेक लाडक्या बहिणींकडून विचारणा होत होती.

2 मे पासून या योजनेची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. योजनेंतर्गत महिलांना 1500 रुपये दिले जाणार आहेत. याबाबत आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे की, एप्रिल महिन्याचा हप्ता 2 मे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पुढील दोन ते तीन दिवसांत पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना निधी थेट त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात प्राप्त होईल.

आदिती तटकरे यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे.”

त्यामुळे, ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पुढील दोन ते तीन दिवस महत्त्वाचे असणार आहेत, कारण त्यांच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेमुळे राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला आणखी बळ मिळणार आहे, असे मत मंत्री तटकरे यांनी व्यक्त केले आहे.