Home / महाराष्ट्र / “आमच्यात घुसून षडयंत्र…”; जरांगे-पाटील यांचा मोठा आरोप, आंदोलकांना केले भावनिक आवाहन

“आमच्यात घुसून षडयंत्र…”; जरांगे-पाटील यांचा मोठा आरोप, आंदोलकांना केले भावनिक आवाहन

Maratha Reservation Protest

Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. या आंदोलनामुळे (Maratha Reservation Protest) मुंबईत काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली असून, अनेक ठिकाणी रास्ता रोको झाल्याने आंदोलनाला दिलेल्या परवानगीचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलकांना तात्काळ रस्ते मोकळे करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना भावनिक आवाहन करत मोठे आरोप केले आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मनोज जरांगे यांनी सर्व आंदोलकांना रस्त्यांवरून तातडीने आझाद मैदानावर येण्याचे आवाहन केले आहे. “ज्या आंदोलकांच्या गाड्या रस्त्यावर आहेत, त्या तातडीने मैदानात लावा आणि तुम्हीही तिथेच थांबा,” असे त्यांनी सांगितले.

“तुम्ही जर माझ्यावर विश्वास ठेवत असाल तर माझं ऐका, अन्यथा ज्यांना गोंधळ घालायचा असेल त्यांनी आपल्या गावाकडे निघून जावे,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आंदोलकांना आवाहन केले. “मला आता पाणी पिऊन बोलावं लागत आहे, यावरून मला किती वेदना होत असतील हे समजून घ्या. मी फक्त तुमच्यासाठी एवढे कष्ट सहन करत आहे,” असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.

यावेळी मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनात बाहेरच्या लोकांनी घुसखोरी केल्याचा गंभीर आरोप केला. “आमच्यात घुसून कोणीतरी षडयंत्र करत आहे. आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे ते म्हणाले.

“अंतरावाली सराटीमध्येही हेच लोक होते. तेव्हाही मीडियाला त्रास झाला नव्हता, पण आता मुंबईत त्रास झाल्याचे ऐकायला येत आहे. त्यामुळे आमचा संशय बळावतोय. ज्यांना राजकीय नेत्यांचे पाय चाटायचे आहेत, त्यांनी माझ्या नादी लागू नये,” असा इशाराही त्यांनी दिला.

आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही, असे ठामपणे सांगताना मनोज जरांगे यांनी सरकारवरही नाराजी व्यक्त केली. “सरकार नुसत्या बैठका घेत आहे, पण चर्चेसाठी येत नाही. 150 मीटर अंतरावर असूनही त्यांना चर्चेसाठी येता येत नाही,” असे म्हणत त्यांनी सरकारला चर्चेला येण्याचे आवाहन केले. “मी मेलो तरी या ठिकाणाहून उठणार नाही, फक्त तुम्ही शांतता राखा,” असेही त्यांनी स्पष्ट केले.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

Hyderabad Gazette : हैदराबाद गॅझेटबाबत मसुदा अंतिम टप्प्यात! मंत्री विखे पाटलांची माहिती

जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार?आरोपांना शशिकांत शिंदेंचे आव्हान

लंगणात वैद्यकीय प्रवेशासाठी ४ वर्ष वास्तव्याची अट कायम ! सर्वोच्च न्यायालयाचे आदेश