राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचे संकेत दिल्यानंतर या चर्चांना उधाण आले आहे. राज्यात मराठी-हिंदी भाषा वाद पेटला असताना दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.

ठाकरे बंधू (MNS Shivsena Alliance) एकत्र येण्याची चर्चा सुरू झाल्यावर आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

ठाकरे बंधू एकत्र येण्यावर फडणीस काय म्हणाले?

मनसे आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) युतीच्या चर्चांवर प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल. कोणीही मतभेद विसरून एकत्र येत असेल तर यामध्ये काहीही वाईट वाटण्याचे कारण नाही.

ते पुढे म्हणाले की, फक्त मला वाटते की आमचे माध्यमं आहेत, ते त्यावर जरा जास्त विचार करत आहेत. त्यामुळे वाट पाहा, दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आम्ही स्वागत करू. ऑफर देणारे हे, त्यानंतर त्यावर प्रतिसाद देणारे आणि अटी ठेवणारेही तेच. त्यावर मी काय बोलणार? त्यामुळे याबाबत त्यांनाच विचारा.

ठाकरे बंधूंचे एकत्र येण्याचे संकेत

दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यानंतर युतीची चर्चा सुरू झाली. मांजरेकर यांनी राज ठाकरेंना दोन्ही बंधू एकत्र येणार का? असा प्रश्न विचारला. याव उत्तर देताना ‘आमच्यातले वाद किरकोळ आहेत, महाराष्ट्र मोठा आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी एकत्र येणं कठीण नाही’, असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील त्वरित सकारात्मक प्रतिक्रिया दिली. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठी माणसांना एकत्र येण्याचं आवाहन करतो, असे म्हणत त्यांनी युतीची येण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, सध्या मनसे- ठाकरे गटाची केवळ युतीची चर्चा सुरू आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हे दोन्ही बंधू एकत्र येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.