मराठी कागदपत्रे घेण्यास नकार; युनियन बँकेला मनसेचा दणका

MNS slams Union Bank for refusing to accept Marathi documents

नागपूर – नागपुरातील युनियन बँक ऑफ इंडियाकडून (Union Bank of India) बोपचे कुटुंबीयांच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणातील नुकसान भरपाईसाठीचा अर्ज मराठीत (Marathi) असल्यामुळे नाकारण्यात आला होता. याची माहिती मिळताच मनसेने (MNS) आज युनियन बँकेच्या सेमिनरी हिल्स शाखेसमोर आंदोलन केले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी बँकेच्या फलकांना काळे फसले. त्यानंतर बँकेने मराठी अर्ज घेण्यास होकार दिला आहे.

विशाल बोपचे या युवकाचा ८ जुलै रोजी अपघातात मृत्यू झाला होता. मृत विशालकडे युनियन बँकेचे एटीएम (ATM) कार्ड होते. त्याला अपघात विमा कवच लागू होता. त्याच्या कुटुंबाने विमा भरपाईसाठी आवश्यक ती प्रक्रिया सुरू केली. पण जेव्हा त्यांनी एफआयआरची प्रत सादर केली, तेव्हा बँक मॅनेजरने ती मराठीत असल्यामुळे ग्राह्य धरता येणार नाही. एफआयआरची (FIR) प्रत इंग्रजीत तयार करू आणा तर विमा मिळेल, असे सांगितले

विशेष म्हणजे, एफआयआरमध्ये मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेचा समावेश असतो. तरीही मराठी असल्याचे कारण देत बँक आणि विमा कंपनीने भरपाई देण्यास स्पष्ट नकार दिला. या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बँकेच्या सेमिनरी हिल्स शाखेसमोर जोरदार आंदोलन छेडले. मनसे कार्यकर्त्यांनी बँकेच्या फलकांना काळे फासले आणि व्यवस्थापनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यभाषा असलेल्या मराठीला अशी वागणूक दिली जाणे लज्जास्पद आहे अशी प्रतिक्रिया मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली. आंदोलनाच्या दबावानंतर युनियन बँकेने अखेर मराठी कागदपत्रे स्वीकारण्याची तयारी दर्शवली.