Mohit Kamboj SRA: भाजपाचे वादग्रस्त तरुण नेते मोहित कंबोज यांनी काही दिवसांपूर्वी सक्रिय राजकारणातून संन्यास घेत व्यवसायावर लक्ष केंद्रित करणार असल्याची घोषणा केली. कंबोज यांच्या या निर्णयामुळे भाजपामधील अनेकांना धक्का बसला होता. पण आता त्यांच्या कंपनीला मुंबईतील अनेक महत्त्वाचे एसआरए प्रकल्प दिले गेले असल्याचा आरोप होत आहे. याविषयीची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी एक्स पोस्ट करून कंबोज यांना इतके मोठे प्रकल्प मिळतात कसे, असा सवाल उपस्थित केला आहे.
वर्षा गायकवाड यांनी कंबोज यांचे नाव न घेता आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, भाजपातून ‘व्हीआरएस’ घेतलेल्या एक नेता – कम – बिल्डरला एकापाठोपाठ एक एसआरए प्रोजेक्ट कसे मिळतात? जुहू येथे मुंबई महापालिकेच्या सफाई कामगार कॉलनीची जमीनही त्याच्याशी संलग्न कंपनीला कशी दिली? जनतेचे हे प्रश्न आम्ही विचारताच, या महाशयांना आणि भाजपाच्या आयटी सेलला इतकी मिरची लागली की त्यांनी लगेच फेक नरेटिव्ह फॅक्टरी पूर्ण वेगाने सुरू केली. माझ्या आणि माझ्या पतीबद्दल खोट्या गोष्टी पसरवून अपप्रचार करायला लागले. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की, आमचा बाण थेट निशाण्यावर लागला आहे. यांच्या बोगस आयटी सेलने असा खोटा प्रचार केला की, माझ्या पतीचे पत्राचाळ प्रकल्पात अनेक फ्लॅट आहेत. मी त्यांना आव्हान देते की, असा एकतरी फ्लॅट दाखवून द्या. ते दाखवू शकणार नाहीत. कारण हे धादांत खोटे आहे. हा यांचा नेहमीचा अजेंडा आहे. खोटे आरोप करा, विरोधकांना धमकावा. पण जर कोणाला वाटत असेल की, त्यांच्या धमक्यांमुळे आम्ही सत्याची लढाई सोडून देऊ, तर त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. मी काँग्रेसची शिपाई आहे आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनुयायी आहे, मी घाबरणार नाही, सत्यासाठी लढत राहणार. माझी मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा एकदा मागणी आहे की, या नेत्याच्या कंपनीला अचानक इतके प्रकल्प कसे मिळाले, याची निष्पक्ष चौकशी करा.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्स पोस्ट करत मागणी केली की, एसआरएने तत्काळ खुलासा करावा की, मोहित भारतीय (मोहित कंबोज) यांच्या कंपनीला किती प्रोजेक्ट मिळाले आहेत? डर किस बात का?
उबाठा नेत्या सुषमा अंधारे यांनी आज अत्यंत खोचक शब्दांत केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, केशव – माधव मराठी आहेत. तेव्हा मराठी माणसाने फक्त सतरंज्या उचलायच्या आणि मलिदा मात्र उपर्या कंबोजला मिळणार. फक्त, परप्रांतीय कंबोजलाच मिळणार पोळी. काय केशवराव, माधवराव पटतंय ना? ही भाजपा अडवाणी-वाजपेयींची भाजपा नाही. ही भाजपा हुकूमशाहीने भरलेली आहे. विरोधकांचे सहअस्तित्व नाकारतेच. पण सोबतच सत्ताधारी स्वपक्षातल्या लोकांनासुद्धा लाथाडते. सत्तेतला वाटा असो कंत्राट असो की निधी असो केशवराव तुमच्या तोंडाला पानेच पुसली जाणार.
मूळचे उत्तर प्रदेशातील वाराणसीचे रहिवासी असलेले मोहित कंबोज 2002 मध्ये मुंबईत आले. त्यांची आभुषणे, रत्ने यांची केबीजी कंपनी आहे. ते इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. भाजपाने 2013 मध्ये त्यांच्याकडे मुंबई शहर भाजपाचे उपाध्यक्ष पद दिले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना दिंडोशी मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र शिवसेनेच्या सुनील प्रभूंनी त्यांचा पराभव केला.
आपल्यावरील एसआरए प्रकल्पाचे आरोप फेटाळताना कंबोज यांनी म्हटले आहे की, यापैकी कोणतेही पुरावे सादर करू शकलेले नाहीत. वर्षा गायकवाड यांना विनंती आहे की, असे कोणते प्रकल्प शासनाने मला दिले याची अधिकृत माहिती जाहीर करा. जर जाहीर करणार नसाल तर तुम्ही राजकारणातून निवृत्त व्हा. माझ्यावर खोटे आरोप करून अनेकांना मोठे व्हायचे आहे. पण त्या सर्वांना मला सांगायचे आहे की, माझ्या कंपनीची विनाकारण बदनामी करू नका.
हे देखील वाचा – Waqf Act: वक्फ कायद्यातील दोन सुधारणा स्थगित, बोर्ड मुस्लीम बहुलच राहील; कोर्टाचा निर्णय