ladki bahin yojana| १४ हजारांहून अधिक पुरुषांनी लाडकी बहीणचा लाभ घेतला

ladki bahin yojana

मुंबई- महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत (ladki bahin yojana) मोठा गोंधळ उघड झाला आहे. या योजनेचा लाभ तब्बल १४,२९८ पुरुषांनी घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, त्यांना १० महिन्यांमध्ये २१.४४ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत..

मागील विधानसभा निवडणुका (assembly elections) जवळ असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली ही योजना जाहीर झाली होती. महाराष्ट्रातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आता या योजनेच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटी असल्याचे स्पष्ट होत आहे. ऑगस्ट २०२४ पासून योजनेचा अंमल सुरू झाला. त्यानंतर मिळालेल्या लाभार्थ्यांच्या यादीत १४ हजारांहून अधिक पुरुषांचा समावेश झाला. त्यांना योजनेचा लाभ कोणी आणि कसा दिला, याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. सार्वजनिक वितरण प्रणालीतील डेटा पडताळणी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, २ लाख ३६ हजार १४ लाभार्थ्यांबाबत शंका आहे की, त्यांनी पुरुष असूनही महिलांची नावे देऊन लाभ घेतला असावा, असे म्हटले जात आहे. यासंबंधी तपासणी सुरू आहे. सध्या या १४,२९८ पुरुषांचे मानधन थांबवण्यात आले आहे.

शिवाय योजनेच्या अटींनुसार ६५ वर्षांवरील व्यक्तींना लाभ मिळणार नाही, असा नियम असूनही, २ लाख ८७ हजार ८०३ वयोवृद्ध महिलांनी लाभ घेतल्याचे आढळून आले. त्यांना १० महिन्यांत ४३१.७० कोटी रुपये मिळाले असून, हे लाभधारक वगळले जाणार असल्यामुळे सरकारचे ५१८ कोटी रुपये वाचणार आहेत. याशिवाय, एएका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही असा नियम असताना ७ लाख ९७ हजार ७५१ कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) म्हणाले की, ही योजना चांगल्या भावनांतून तयार करण्यात आली होती. या योजनेत पुरुषांची नावे येण्याचे कारणच नाही. काही पुरुषांची नावे यादीत आली असतील, तर ती यादी दुरुस्ती करताना झालेली चूक असू शकते. मात्र, पुरुषांनी खरोखरच या योजनेचा लाभ घेतला असेल, तर त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल. त्यांनी घेतलेले पैसे परत वसूल केले जातील.