Mukhyamantri Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी स्पष्ट केले आहे की, या योजनेचा एप्रिलमधील हप्ता महिना संपण्यापूर्वीच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्या पुणे येथे पत्रकारांशी बोलत होत्या.
अनेक महिला योजनेचे पैसे जमा झाले आहेत की नाही, याची खात्री करण्यासाठी बँकेत गर्दी करत आहेत. मात्र, अद्याप एप्रिल महिन्याचा हप्ता शासनाकडून जारी करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर मंत्री तटकरे यांनी माहिती दिली की, एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांना मिळेल.
या योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ पहिल्यापासून मिळत आहे आणि तो यापुढेही मिळत राहील.
नमो शेतकरी योजनेतील (Namo Shetkari Yojana) महिला लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 500 रुपये मिळण्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, या दोन्ही योजनांच्या शासन निर्णयात याबाबत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. नमो शेतकरी योजनेतून मिळणारे 1 हजार रुपये आणि लाडकी बहीण योजनेतून मिळणारे 500 रुपये, असे एकूण किमान १५०० रुपये महिलांना मिळावेत, हा शासनाचा दृष्टिकोन आहे.
दरम्यान, आदिती तटकरे यांनी हप्ता जमा होण्याची निश्चित तारीख सांगितली नसली तरी, एप्रिल महिना संपायला आता केवळ 9 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना या पैशांची प्रतीक्षा आहे. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, 30 एप्रिल रोजी असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी हा निधी वितरित केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पात्र महिलांना 30 एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.