बसप्रेमींच्या मेहनतीला सलाम! मुंबईच्या बेस्ट बसेसचा 99 वर्षांचा इतिहास आता चित्रांच्या रूपात

Mumbai BEST Bus

Mumbai BEST Bus : मुंबईतील बेस्ट बसचा स्वतःचाच एक इतिहास आहे. जवळपास 100 वर्षांपूर्वी बेस्ट बसचा प्रवास सुरू झाला होता. गेल्या 99 वर्षांत मुंबईच्या रस्त्यांवर धावलेल्या प्रत्येक बेस्ट बस मॉडेलची तपशीलवार चित्रे आता उपलब्ध झाली आहेत.

मुंबईतील बसप्रेमी वरुण दीक्षित यांच्या दशकाहून अधिक काळाच्या मेहनतीला यंदा अनिक डेपोमधील बेस्ट संग्रहालयात विशेष स्थान मिळाले आहे. ही पिक्सेल आर्ट चित्रे बेस्ट बसेसच्या शंभर वर्षांच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग बनली आहेत.

मिड डे ला दिलेल्या मुलाखतीत वरुण म्हणाले, “मी 15 मे 1991 रोजी माहीम येथे जन्मलो. ठाण्याला स्थलांतरित झाल्यावर 2002 मध्ये मी बसेसचे स्केचिंग सुरू केले. 2006 मध्ये डिजिटल कॅमेरा घेऊन फोटो काढले आणि डायरीत क्रमांक नोंदवले.”

बेस्ट बसेसची अनेक मॉडेल्स 21 वर्षांऐवजी 15 वर्षांच्या आयुर्मर्यादेमुळे लवकरच बदलली जात होती. त्यामुळे, 2006 मध्ये मी माझा पहिला डिजिटल कॅमेरा घेऊन बसेसचे फोटो काढायला सुरुवात केली. मी माझ्या डायरीमध्ये बसेसचे क्रमांक आणि मॉडेल्सची नोंदही केली, ज्यामुळे मला अचूक चित्रे काढण्यास मदत झाली., असे त्यांनी सांगितले.

डिजिटल आर्टचा विकास

2014 मध्ये वरुणने मायक्रोसॉफ्ट पेंट वापरून डिजिटल चित्रे बनवण्यास सुरुवात केली. 2015 मध्ये बेस्ट संग्रहालयाला भेट दिल्यावर क्युरेटर यतीन पिंपळे यांच्याशी त्यांची ओळख झाली. पिंपळे यांनी मापांची माहिती दिली आणि वरुणने त्याच वर्षी हाताने रंगवलेले चित्र संग्रहालयाला भेट दिले. 2022 मध्ये त्यांनी सोशल मीडिया ग्रुप तयार करून सहकाऱ्यांसह चित्रांना अचूकता दिली.

संग्रहालयातील नवीन आकर्षणे

यतीन पिंपळे म्हणाले की, “वरुणने 99 वर्षांतील सर्व प्रवासी बसेसची चित्रे काढली आहेत. आम्ही मूळ छायाचित्रांसह संदर्भही दिले आहेत.” बेस्टच्या सुवर्ण महोत्सवाच्या वेळी बनवलेल्या 26 बस डेपोच्या प्रतिकृतीला 28 वर्षांनंतर दुरुस्ती मिळाली. मुंबईच्या रस्त्यांवरील विविध दिव्यांचा स्ट्रीट लाईट ट्री डिस्प्ले आणि संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर ग्राफिटीही जोडण्यात आली आहे.