Mumbai Double Decker Bus: मुंबईकरांच्या लाडक्या आणि 15 वर्षांहून अधिक काळ सेवा देणाऱ्या लाल डबल-डेकर बसला (Mumbai Double Decker Bus) आता 4007/बीएम/ए हा नवीन पत्ता मिळाला आहे. सप्टेंबर 2023 मध्ये डबल डेकर बस निवृत्त झाल्या. यातील शेवटच्या बसचे आता संग्रहालयात रुपयांत करण्यात आले आहे.
ही बस आता अनिक डेपोतील बेस्ट म्युझियममध्ये फिरते संग्रहालय बनवण्यात आली आहे. हे देशातील पहिले संग्रहालय आहे, जे डबल-डेकर बसेसच्या इतिहासाला समर्पित आहे. ही बस काळजीपूर्वक पुन्हा सजवण्यात आली असून, मुंबईच्या डबल-डेकरचा समृद्ध इतिहास, पॉप कल्चरवर प्रभाव आणि जागतिक उत्क्रांती यांचे प्रदर्शन होईल.
बसचा इतिहास आणि महत्त्व
मिड डे च्या रिपोर्टनुसार, या संग्रहालयाची संकल्पना बेस्ट म्युझियमचे क्युरेटर यतीन पिंपळे आणि सहाय्यक अंबदास गर्जे यांनी बसप्रेमींच्या मदतीने तयार केली. पिंपळे म्हणाले, “हा देशातील असा पहिलाच उपक्रम आहे. आम्ही मुंबई आणि जागतिक स्तरावरील डबल-डेकरचा इतिहास, तसेच बॉलिवूडमधील त्यांचा वापर दाखवला आहे.”
1983 च्या वीजपुरवठा खंडित होण्यापासून 26/7 च्या पुरापर्यंत आणि रेल्वे संपादरम्यानही ही बस मुंबईकरांसाठी विश्वासार्ह साथीदार ठरली.
उद्घाटन आणि वैशिष्ट्ये
ही बस 7 ऑगस्ट रोजी बेस्ट डे निमित्त जनतेसाठी खुली करण्यात आली. याच दिवशी 1947 मध्ये बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवेज कंपनी महानगरपालिकेत विलिन झाली. बसच्या दोन्ही स्तरांवरील जागा काढून प्रदर्शन आणि स्मृतीचिन्हे ठेवण्यात आली आहेत.
या बसला स्क्रॅप होण्यापासून वाचवण्यासाठी मुंबईतील बसप्रेमींनी मोहीम चालवली होती. अखेर बसप्रेमींच्या प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक वारसा जतन झाला आहे.