NH-48 Traffic Jam: भारतातील अनेक शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या भीषण होत चालली आहे. वाहतुक कोंडीत अडकल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याचे समोर आले आहे. आतामुंबईला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे एका 49 वर्षीय महिलेचा जीव गमवावा लागला आहे.
पालघर जिल्ह्याच्या छाया पुरव (Chhaya Purav) यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे मुंबईतील रुग्णालयात हलवले जात असताना, हा दुर्दैवी प्रसंग घडला. या घटनेने पालघरमधील आरोग्य सुविधांची (Health Infrastructure) आणि एनएच-48 या महामार्गावरील वाहतूक कोंडीची गंभीर समस्या पुन्हा एकदा समोर आणली आहे.
झाडाची फांदी पडून छाया पुरव यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या बरगड्या, खांदे आणि डोक्याला मार लागला होता. पालघरमध्ये ट्रॉमा सेंटर नसल्यामुळे स्थानिक रुग्णालयाने त्यांना मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला.
साधारणपणे 100 किमीचे हे अंतर कापायला 2.5 तास लागतात. त्यानुसार, दुपारी 3 च्या सुमारास त्यांना भूल देऊन रुग्णवाहिकेतून मुंबईकडे नेले जात होते. त्यांचे पती कौशिक पुरव हे त्यांच्यासोबत होते. मात्र, एनएच-48 वर प्रचंड वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली. तीन तासांनंतरही रुग्णवाहिका अर्धेच अंतर कापून शकली होती.
त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना हिंदुजा हॉस्पिटलऐवजी ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासणी करून छाया पुरव यांना मृत घोषित केले.
“अर्धा तास आधी पोहोचलो असतो तर…”
छाया पुरव यांचे पती कौशिक यांनी सांगितले की, डॉक्टरांनी त्यांना सांगितले “जर तुम्ही 30 मिनिटे आधी पोहोचला असता, तर तिचा जीव वाचू शकला असता.”
ते म्हणाले, “मी तिला चार तास असह्य वेदना सहन करताना पाहिले. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तिला खूप त्रास होत होता. ती वेदनेने ओरडत होती. लवकरात लवकर रुग्णालयात घेऊन जाण्याची विनवणी करत होती. पण आम्ही वाहतूक कोंडीत अडकलो होतो आणि काही वाहने चुकीच्या दिशेने येत असल्याने कोंडी आणखी वाढत होती.”