Mumbai Metro 3 | मुंबईकरांसाठी प्रवास आता अधिक सुकर आणि जलद होणार आहे. बहुप्रतीक्षित मुंबई मेट्रो-3 चा अर्थात शहराच्या पहिल्या भूमिगत मेट्रोचा दुसरा टप्पा कार्यान्वित झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) ते वरळी येथील आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले.
या नवीन मेट्रो सेवेमुळे आता बीकेसी ते वरळी हे अंतर केवळ 15 मिनिटांत गाठणे शक्य होणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मेट्रो-3 च्या आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याची सुरुवात ऑक्टोबर 2024 मध्ये झाली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम वेगाने सुरू होते आणि अखेर आज बीकेसी ते वरळी नाका हा 9.8 किलोमीटरचा दुसरा टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. या टप्प्यात एकूण 6 भूमिगत स्थानके असून, बीकेसीपासून सुरू होणारा हा मार्ग धारावी, शीतलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक या स्थानकांवर थांबतो.
दुसरा टप्पा सुरू झाल्यामुळे आता आरे कॉलनी ते वरळी असा थेट भूमिगत मेट्रो प्रवास करणे शक्य झाले आहे. आरे कॉलनी ते वरळी नाका या संपूर्ण प्रवासासाठी प्रवाशांना 60 रुपये तिकीट भाडे भरावे लागणार आहे. तर, बीकेसी ते वरळी नाका या दरम्यानच्या प्रवासासाठी किमान भाडे 10 रुपये आणि कमाल भाडे 40 रुपये असणार आहे.
मुंबई मेट्रो प्रशासनाचा आता तिसरा आणि अंतिम टप्पा, जो वरळी ते कफ परेड असा 11.3 किलोमीटरचा आहे, तो जुलै महिन्याच्या अखेरीस सुरू करण्याचा मानस आहे. या टप्प्याचे 94.85 टक्के काम पूर्ण झाले असून, याच्या सुरुवातीनंतर संपूर्ण 33.5 किलोमीटरचा आरे ते कफ परेड हा मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी उपलब्ध होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि महाराष्ट्रात मेट्रो नेटवर्कचा मोठ्या प्रमाणात विस्तार होतोय. मेट्रो-3 ही देशातील सर्वात लांब आणि पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्गिका आहे. या प्रकल्पाची सुरुवात 2017 मध्ये झाली आणि आता तो अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ‘आचार्य अत्रे चौक ते कफ परेड’ हा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न असून, त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल.
सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्गांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मार्गावर एकूण 26 स्थानके असून, प्रत्येक स्थानकाला अनेक प्रवेश मार्ग आहेत. विशेष म्हणजे, मेट्रो-3 विमानतळाला जोडली जाणार असल्याने प्रवाशांना थेट मेट्रोने विमानतळापर्यंत पोहोचता येणार आहे. लवकरच मुंबईकरांना एकाच तिकिटावर मेट्रो, मोनोरेल, लोकल आणि बसने प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मेट्रो-3 च्या दुसऱ्या टप्प्यातील स्थानके:
- बीकेसी
- धारावी
- शीतलादेवी मंदिर
- दादर
- सिद्धिविनायक मंदिर
- वरळी
- आचार्य अत्रे चौक (वरळी नाका)
मेट्रो-3 च्या या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि वेळेची बचत करणारा ठरेल, यात शंका नाही.