मुंबई – अभिनेत्री करिश्मा कपूर हिचे घटस्फोटित पती संजय कपूर यांचा १२ जून रोजी इंग्लंडमध्ये गोल्फ खेळताना मधमाशी तोंडात जाऊन वयाच्या ५३ व्या वर्षी मृत्यू झाला होता. त्यांची आई राणी कपूर यांनी या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर जबरदस्ती, कागदपत्रांचा गैरवापर आणि कौटुंबिक वारसा बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला आहे. त्यामुळे कपूर कुटुंबाच्या मालकीच्या उद्योग समूहातील अंतर्गत वाद उघड झाला आहे.
राणी कपूर या कपूर कुटुंबाच्या मालकीच्या सोना कॉमस्टार समूहाच्या प्रमुख आहेत. त्यांचे वकील वैभव गग्गर म्हणाले की, एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत असताना, अशा काही घटना घडल्या आहेत, ज्यामुळे त्यांना केवळ मृत्यू कसा झाला याबद्दलच नव्हे तर वारशाच्या बाबतीतही काही शंका निर्माण झाल्या आहेत. यासाठीच त्यांनी सोना कॉमस्टारच्या भागधारकांना पत्र लिहिले आहे.
या पत्रात राणी कपूर यांनी वार्षिक सर्वसाधारण सभे (एजीएम) वर तीव्र आक्षेप नोंदवत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा संजय कपूर यांच्या अचानक आणि संशयास्पद मृत्यूनंतर कुटुंबासाठी शोकाच्या काळात ही सभा आयोजित केली जात आहे. माझ्या मुलाच्या मृत्यूनंतर घडलेल्या घटनांना सामान्य म्हणता येणार नाही. वारंवार प्रयत्न करूनही मला याबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा कागदपत्रे मिळालेली नाहीत. अजिबात नैसर्गिक वाटत नव्हता. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजलेले नाही. संजयच्या मृत्युमुळे शोकाकूल असताना मला काही कागदपत्रांवर स्वाक्षरी करायला लावण्यात आल्या. या कागदपत्रांमधील मजकूर मला कधीही दाखवण्यात आला नाही. कंपनीची खाती आणि महत्त्वाची कागदपत्रे वापरण्यास नकार देण्यात आला. काही गोष्टींसाठी दबाव आणण्यात आला. सध्या बर्याच गोष्टी उलगडत आहे. मात्र, हे सारे मला खोलात जाऊन जाणून घ्यायचे आहे.