Nagpur Cab Fare: महाराष्ट्रात ॲप-आधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) यांसारख्या प्लॅटफॉर्मवर (प्लॅटफॉर्म) काम करणाऱ्या हजारो टॅक्सी चालकांनी भाडे वाढीबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. नुकतेच, टॅक्सी चालकांकडून याबाबत संप देखील करण्यात आला. त्यानंतर आता टॅक्सी चालकांकडून स्वतंत्र भाडे प्रणाली लागू करण्यात आली आहे.
मुंबई, पुणे पाठोपाठ नागपुरमधील टॅक्सी चालकांनी धाडसी पाऊल उचलत स्वतःची ‘स्वतंत्र भाडे प्रणाली’ लागू केली आहे. चालकांनी आता पहिल्या 3 किलोमीटरसाठी किमान 100 रुपये भाडे आकारण्यास सुरुवात केली आहे, त्यानंतर एसी टॅक्सींसाठी प्रति किलोमीटर 25 रुपये आणि नॉन-एसी टॅक्सींसाठी प्रति किलोमीटर 21 रुपये आकारले जात आहेत.
नुकतेच टॅक्सी चालकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या माध्यमातून अधिकृत भाडे निश्चित करणे,ई-बाईक टॅक्सी धोरण स्थगित करणे आणि चौकशी न करता चालकांची ओळख रद्द करण्याचा नियम मागे घेण्यासंदर्भातील मागण्या करत आंदोलन केले होते. या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे
द लाइव्ह नागपूरच्या रिपोर्टनुसार, विदर्भ ॲप टॅक्सी युनियनचे अध्यक्ष दीपक साने यांनी स्पष्ट केले की, “4,000 ते 5,000 चालकांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे आणि सध्यातरी हा पर्याय आमच्यासाठी अपरिहार्य आहे.”
ही नवी भाडेप्रणाली पुण्यातील स्वरूपाशी साधर्म्य साधणारी आहे. प्रवाशांना अतिरिक्त भूर्दंड बसत असल्याने काही प्रवाशांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.