Nashik Simhastha Kumbh Mela- नाशिकमध्ये २०२६ – २७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा (Nashik Simhastha Kumbh Mela 2026-27) होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन जसजसे वेग घेत आहे, तसतसे महायुतीतील (Mahayuti) नेत्यांमध्ये वर्चस्वाची चुरस वाढताना दिसत आहे. सुरुवातीला कुंभमेळा मंत्री म्हणून भाजपचे (BJP) गिरीश महाजन (Girish Mahajan) हेच नियोजनात पुढे होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) व अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी आढावा बैठक घेऊन प्रवेश केला. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) देखील या नियोजनात उतरले असून, ते लवकरच कुंभमेळ्याबाबत स्वतंत्र बैठक घेणार असल्याची माहिती मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिली. दरम्यान कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींचा निधी मिळणार असल्यानेच महायुतीतील नेते पालकमंत्रीपद मिळावे आणि नियोजनात आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत वाद सुरू आहे. कुंभमेळा व आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पदाला विशेष महत्त्व आले आहे. गिरीश महाजन यांनी सहकारी पक्षांना नियोजनापासून अलिप्त ठेवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळेच भाजपकडेच श्रेय जाऊ नये यासाठी राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते सक्रिय होत असल्याचे चित्र दिसत आहे. भुजबळांनी स्थानिक मंत्री म्हणून आढावा घेण्याचा अधिकार सांगत बैठका घेतल्या, तर एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या माध्यमातून सूत्रे हातात घेतली आहेत. गोदावरी स्वच्छता आणि प्रदूषणमुक्तीसाठी मंजूर १,४०० कोटींच्या योजनांमध्ये कंत्राटदारांबाबतचे वाद, शिंदेंच्या हस्तक्षेपामुळे पहिल्या टप्प्यातील कामांना स्थगिती मिळाल्याने राजकीय वातावरण अधिक तापले आहे.