Navi Mumbai Airport Name Controversy- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेता दि. बा. पाटील (D.B. Patil) आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्याचा प्रश्न पुन्हा पेटला असून आता हा मुद्दा न्यायालयात (Court) गेला आहे. केंद्र सरकारकडून होत असलेल्या विलंबाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (High Court) जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत म्हटले आहे की, विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यायचे ठरवले आहे की नाही, याबाबत केंद्र सरकारने केलेला पत्रव्यवहार न्यायालयासमोर सादर करावा.
ही याचिका प्रकाशझोत सामाजिक संस्था या माध्यमातून विकास परशुराम पाटील यांनी दाखल केली आहे. यात केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, सिडको, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रा. लि. तसेच अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. राज्य सरकारने आधीच विमानतळाच्या नामकरणाचा ठराव मंजूर करून केंद्राकडे पाठवला आहे. मात्र, अंमलबजावणीस होणाऱ्या विलंबामुळे प्रकल्पग्रस्त व स्थानिक जनतेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.