NEP 2020 recommendations for school education | राज्यातील मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 5 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. यापूर्वी या वर्गांमध्ये दोनच भाषा शिकवल्या जात होत्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) अंतर्गत महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करताना हा निर्णय घेण्यात आला आहे.
शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात नवीन अभ्यासक्रम आराखड्याच्या टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीची घोषणा केली. जारी करण्यात आलेल्या शासकीय निर्णयानुसार (GR), मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आतापर्यंत केवळ दोन भाषा शिकवल्या जात होत्या. मात्र, NEP च्या शिफारशीनुसार तिसरी भाषा म्हणून हिंदीचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, इतर माध्यमाच्या शाळांमध्ये आधीपासूनच इंग्रजी, मराठी आणि त्यांच्या मूळ माध्यमाची भाषा शिकवली जात असल्याने तेथे त्रिभाषा सूत्र लागू आहे.
NEP 2020 अंतर्गत नवीन 5+3+3+4 शालेय शिक्षण संरचना देखील महाराष्ट्रात लागू केली जाणार आहे. या संरचनेनुसार –
- पहिले 5 वर्षे (3 वर्षे पूर्व-प्राथमिक + इयत्ता 1 ली व 2 री) पायाभूत टप्पा,
- इयत्ता 3 री ते 5 वी – तयारीचा टप्पा,
- इयत्ता 6 वी ते 8 वी – मध्य टप्पा,
- तर इयत्ता 9 वी ते 12 वी – उच्च माध्यमिक टप्पा असेल.
ही अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होणार असून, सुरुवात शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इयत्ता 1 ली पासून केली जाणार आहे. त्याचप्रमाणे त्रिभाषा सूत्राचीही अंमलबजावणी इयत्ता 1 लीपासून सुरू होईल.
नवीन अभ्यासक्रमानुसार, महाराष्ट्र राज्य मंडळाची पाठ्यपुस्तके आता NCERT च्या अभ्यासक्रमावर आधारित असतील. मात्र, सामाजिक शास्त्र व भाषा यांसारख्या विषयांत महाराष्ट्राच्या स्थानिक घटकांचा विचार करून आवश्यक बदल केले जातील. इयत्ता 1 ली साठीची पाठ्यपुस्तकं बालभारती तर्फे प्रकाशित केली जात आहेत.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (SCERT) संचालक राहुल रेखावार यांनी सांगितले की, “पूर्व-प्राथमिक विभागासाठीचा अभ्यासक्रम तयार असून, तो महिला व बालविकास विभागाच्या सहकार्याने अंगणवाड्यांमध्ये लागू केला जाणार आहे. यासाठी अंगणवाडी शिक्षिकांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येतील.”
जुना अभ्यासक्रम शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठी SCERT कडून ब्रिज कोर्स तयार करण्यात आला आहे. याशिवाय, महाराष्ट्र मंडळाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यांकन आता Holistic Progress Card (HPC) च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. रेखावार यांनी स्पष्ट केलं की, “गुणांवर आधारित प्रगती पुस्तकांच्या तुलनेत HPC मध्ये शैक्षणिक परिणामांसोबतच विद्यार्थ्यांच्या वर्तणूक, व्यक्तिमत्त्व आणि इतर अंगांचा समावेश असेल.”
या नव्या प्रणालीची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इयत्ता 1 ली पासून सुरू केली जाणार आहे.