Sandip deshpande – महाराष्ट्रात काल कॅश बॉम्ब व्हिडिओने खळबळ उडवल्यानंतर भ्रष्टाचाराचे आणखी दोन नवे धक्कादायक व्हिडिओ आज व्हायरल झाले. काल उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी रायगडमधील शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा नोटांच्या पुडक्यांसहचा व्हिडिओ जारी केल्यानंतर आज शेकापच्या नेत्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी रायगडचेच आणि पुन्हा शिंदे सेनेचेच मंत्री भरत गोगावले यांचा नोटांच्या बंडलासह व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर गंभीर आरोप केले. त्याबरोबर मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandip deshpande) यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यातील उघड लाचखोरीचा दुसरा व्हिडिओ आज जारी केला. या भ्रष्टाचाराची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी दोघांनीही केली. मात्र काल व्हिडिओ बॉम्बनंतर जशी सर्वपक्षीय शांतता होती तशीच आजही होती. जनता मात्र भ्रष्टाचाराचे हे व्हिडिओ पाहून थक्क झाली आहे.
साहेबांना 25 टक्के द्यावे लागतात
संदीप देशपांडे यांचा दुसरा व्हिडिओ
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी काल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरळीतील (पीडब्ल्यूडी) एका अभियंत्याच्या भ्रष्टाचाराचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. आज त्यांनी कुर्ला विभागातील अधिकारी कंत्राटदाराकडून पैसे स्वीकारून ते खिशात ठेवतानाचा नवा व्हिडिओ जारी केला. त्यानंतर संदीप देशपांडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत या खात्याची खालपासून वरपर्यंत चौकशी करण्याची मागणी केली.
या व्हिडिओत पैसे घेणारा अधिकारी आणि कंत्राटदाराचे सविस्तर संभाषण आहे. संदीप देशपांडे यांनी आरोप केला की, आजचा व्हिडिओ कुर्ला विभागामधील एका उपअभियंत्याचा आहे. तो पूर्ण व्हिडिओ बघितला आणि त्यातील संभाषण ऐकले तर लक्षात येईल की त्यात अनेक अधिकार्यांची नावे घेतली आहेत. त्यात एका जिल्हा विकास फंडाचा उल्लेख आहे. व्हिडिओत अधिकारी सांगतो की, हा फंड मिळवण्यासाठी काळे नावाच्या व्यक्तीला लाच द्यावी लागते. कंत्राटदार म्हणतो की आता त्याला मराठे रावसाहेबांचा हिशेब करायचा आहे आणि त्यांनाही पैसे द्यावे लागतील. त्यात आणखी कोणतरी साहेब असा उल्लेख होतो, ते कोण आहेत माहीत नाहीत. परंतु त्यांची चौकशी करणे आवश्यक आहे. त्या साहेबांना 25 टक्के द्यायला लागतात.
त्यानंतर तो अधिकारी म्हणतो की, मी तुम्हाला एकूण 1 कोटी 20 लाख रुपयांचे काम देईन. याचा अर्थ असा की तिथे अधिकार्याची मनमानी चालू आहे. कोणाला काम द्यायचे हे अधिकारी त्यांना मिळणार्या कमिशनवर ठरवतात. कामाची गुणवत्ता पाहिली जाते का? कामाचे वाटप पारदर्शकपणे निविदा प्रक्रियेनुसार होते की निविदा प्रक्रिया न करताच काम वाटले जात आहे? म्हातारी मेल्याचे दुःख नाही. पण काळ सोकावतो आहे.
देशपांडे पुढे म्हणाले की, हा अधिकारी आत्मविश्वासाने सांगतो की माझ्या बढतीच्या वेळेला जो मला जास्त मदत करील त्यालाच पुढचे काम देईन. म्हणजे सिस्टममध्ये इतका भ्रष्टाचार चालू आहे की कोणाचा कोणावर अंकुश नाही. हे व्हिडिओ पोस्ट करून कोणाची बदनामी करणे हा माझा उद्देश नाही तर या विभागात पारदर्शकता यावी ही आमची प्रमुख मागणी आहे. व्हिडिओच्या शेवटी दिसते की, बाहेर बसलेला शिपाई विचारतो की, साहेब, यावेळी दिवाळी का नाही दिली? यावरून लक्षात येते की खालपासून वरपर्यंत संपूर्ण सिस्टम यात सामील आहे.
देशपांडे पुढे म्हणाले की, मला काल माहिती मिळाली की रवींद्र नाट्य मंदिरातील टॉयलेटचे काम चार वर्षांपूर्वी झाले होते आणि ते आता खराब झाले आहे. आता त्यासाठी 50 लाख रुपयांची निविदा काढली जात आहे. असे वारंवार होत आहे. त्यामुळे सिस्टममधील गंभीर भ्रष्टाचार लक्षात येतो. संपूर्ण सिस्टमची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागार्फत करणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही आमच्याकडे असलेले सर्व व्हिडिओ पुरावे तसेच कागदपत्रे त्यांना द्यायला तयार आहोत. या प्रकरणात फक्त वरिष्ठ अधिकारीच नाहीत, तर सर्व स्तरांवरच्या अधिकार्यांचा सहभाग असल्यामुळे खालपासून वरपर्यंत प्रत्येकाची चौकशी होणे गरजेचे आहे.
नोटांसह गोगावले! ईडी लावा
चित्रलेखा पाटील यांची मागणी
शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा नोटांच्या पुडक्यांसहचा व्हिडिओ उबाठाचे अंबादास दानवे यांनी काल प्रसिद्ध केल्यानंतर आज शिवसेनेचेच रायगडमधीलच मंत्री भरत गोगावले यांचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी प्रसिद्ध केला. त्यामुळे अधिवेशनाच्या काळात शिंदे गटावर दुसरा बॉम्ब पडला आहे. चित्रलेखा पाटील या शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या सून आहेत.
चित्रलेखा पाटील यांनी आपल्या मोबाईलमध्ये दाखवलेल्या व्हिडिओत उघड्या बॅगांमध्ये ठेवलेल्या नोटांच्या बंडलांसह मंत्री भरत गोगावले दिसत आहेत. हा व्हिडिओ दाखवून त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाने सीबीआय, ईडी आणि अँटी करप्शन ब्युरोकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, हा व्हिडिओ माझ्याकडे आला, तो मी दाखवला. तो खरा आहे की खोटा याची चौकशी करावी अशी माझी मागणी आहे. गोगावले आणि महेंद्र दळवी हे चीटर आमदार आहेत. ते जनतेची कशी फसवणूक करतात, हे सुनील तटकरे, अनिकेत तटकरे सतत सांगत आहेत. काहीतरी दिसते म्हणूनच ते हे सांगत आहेत. दळवी हे राज्यात सगळ्यात जास्त गुन्हे असलेले आमदार आहेत. त्यांच्यावर कंत्राटदारांवर दबाव टाकण्यापासून घरगुती हिंसाचारापर्यंत
गुन्हे आहेत.
त्या पुढे म्हणाल्या की, माझ्या मतदारसंघात कुजबूज आहे की, सगळी कामे अर्धवट आहेत. कामे का अर्धवट आहेत, असे विचारले की, कंत्राटदार सांगतात की कमिशनमुळे आम्ही दबलेलो आहोत. नुसते हप्ते, कमिशन असे सगळे सुरू आहे. मी दाखवलेल्या व्हिडिओतून सगळे स्पष्ट होत आहे. माझी अशी मागणी आहे की, यांच्या बँक खात्याची चौकशी करावी. यांचा व्यवसाय काय, ते कुठून कमावतात, त्यांची लाइफस्टाईल काय आहे, याचीही चौकशी करा. व्हिडिओत माणसे दिसताहेत, कॅश दिसते आहे. हा व्हिडिओ मॉर्फ आहे, असे आता पन्नास खोके गुवाहाटी गँग म्हणेल. म्हणून मी चौकशीची मागणी करत आहे. हा पैसा आपल्या रस्त्याचा, पाण्याचा, आशा वर्करचा, शेतकर्यांच्याकर्जमाफीचा तर नाही?चित्रलेखा यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना भरत गोगावले म्हणाले की माझ्या फक्त नावात शेठ आहे. मी शेठ नाही . माझ्याकडे इतके पैसे असते तर मी मुंबईत फ्लॅट घेतला असता.
दरम्यान, उबाठा नेते अंबादास दानवे यांनी काल अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा नोटांच्या बंडलांसह व्हिडिओ प्रसिद्ध केल्यावर दळवी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर आरोप केले होते. यावर तटकरे यांनी आज उत्तर दिले. दळवी यांचा राष्ट्रभक्त असा उपरोधिक उल्लेख करत ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करावी. जयप्रकाश नारायण, मधु दंडवते, गणपतराव देशमुख यांचा आदर्श चालवणारे अलिबागचे निरागस लोकप्रिय आमदार महेंद्र दळवी यांच्यावर दानवे यांनी केलेले बेछूट आरोप अत्यंत चुकीचे आहेत. राष्ट्रभक्तीने भारावलेल्या व्यक्तिमत्त्वावर असे आरोप करणे लोकशाहीला मारक आहे. सुसंस्कृत व्यक्तीवर असे नाहक आरोप का केले जातात, याचे कोडे मला उलगडले नाही. त्यामुळे या थोर व्यक्तीवर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच विधिमंडळात घोषित करावी. त्या व्हायरल व्हिडिओची सत्यता शोधून काढावी. आ. दळवी यांनी ज्या राजकीय खलनायकाचा उल्लेख केला त्याचीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेऊन उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी माझी मागणी आहे. आ. दळवी थोर विचारवंत आहेत. ज्यांच्यावर आरोप झाले आणि ज्यांनी आरोप केले त्यांनी याप्रकरणी न्यायालयात जावे. माझा न्यायालयात जाण्याचा प्रश्न येत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझा परिचय जुना आहे. त्यांच्याशी माझे सौहर्दाचे संबंध आहेत. मागील 40 राजकीय जीवनात मी सिद्धांतावर काम करत आलो आहे.
यावर दळवी यांनी तटकरेंना संत असे संबोधून त्यांना तितक्याच उपरोधिकपणे उत्तर दिले. आ. दळवी यांनी दानवे यांना आपल्यावर केलेल्या आरोपांबाबत 8 दिवसांत खुलासा करण्याबाबत नोटीस बजावली आहे. अन्यथा त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. यावर उबाठा नेते अंबादास दानवे म्हणाले की, आ. महेंद्र दळवी यांची चौकशी झाली पाहिजे. तेच सत्य सांगतील. परंतु सरकारची चौकशी करण्याची इच्छा आहे का? शिवसेनेतून फुटलेल्या शिंदे सेनेच्या नेत्यांना भाजपा मुद्दाम बदनाम करत आहे. आतापर्यंत मंत्री संजय शिरसाट, आ. महेंद्र दळवी, आ. अर्जुन खोतकर, शहाजी बापू पाटील या शिंदेंच्याच नेत्यांच्या नोटा पकडल्या आहेत. लाल शर्ट घातलेला माणूस कोण आहे याबाबत चर्चा होते. मात्र स्पष्ट दिसणार्या माणसाला काही विचारले जात नाही. पोलिसांनी माझ्याकडे चौकशी करावी. मी सर्व सांगतो.









