श्री विठ्ठल रुक्मिणी पूजेची २८ जुलै पासून ऑनलाईन नोंदणी

pandharpur pass

पंढरपूर- महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या सर्व प्रकारच्या पूजांसाठी आता भाविकांना ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर या कालावधीतील पूजांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याची सुरुवात २८ जुलै रोजी सकाळी ११ जुलैपासून होत आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले आहे.

तीन महिन्यापूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पूजेच्या ऑनलाइन नोंदणीचा निर्णय घेण्यात आला होता.यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. भाविकांना पूजेची नोंदणी या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे.आतापर्यंत तीन टप्प्यांत ही प्रक्रिया राबविली होती.आता चौथ्या टप्प्यात १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या नित्यपूजा व पाद्यपूजा तसेच १ ते ३१ ऑगस्ट कालावधीतील तुळशी अर्चन पूजा व महानैवेद्य सहभाग योजना ऑनलाईन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत.ऑनलाईन नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत करण्यात येणार आहे. याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

पूजेसाठी देणगी मूल्य

श्री विठ्ठलाच्या नित्यपूजेसाठी २५ हजार रुपये , श्री रुक्मिणीमातेच्या नित्यपूजेसाठी ११ हजार रुपये , पाद्यपूजेसाठी ५ हजार रुपये व तुळशी अर्चन पूजेसाठी २१०० आणि महानैवेद्य सहभाग योजनेसाठी ७ हजार रुपये इतके देणगी मूल्य आकारण्यात आले आहे.