Pooja Khedkar Family New Controversy: वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचे कारनामे यापूर्वीच चर्चेत असताना आता आणखी एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नवी मुंबईतील रबाळे परिसरातून अपहरण झालेला एका ट्रकचा हेल्पर थेट खेडकर कुटुंबाच्या पुण्यातील घरात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणामुळे खेडकर कुटुंबियांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
शनिवारी, 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे सव्वा सात वाजताच्या सुमारास मुलुंड ते ऐरोली मार्गावरील एका सिग्नलवर सिमेंट मिक्सर ट्रक आणि MH 12 RP 5000 या क्रमांकाच्या कारमध्ये किरकोळ अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली.
त्याचवेळी कारमधील दोघांनी ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमार (वय 22) याला जबरदस्तीने त्यांच्या कारमध्ये बसवून घेतले. त्यांनी ट्रक चालकाला, ‘ट्रक आमच्या मागे आणा’, असे सांगितले. मात्र, काही अंतरावर गेल्यावर त्यांची कार नजरेआड झाली.
त्यानंतर घाबरलेल्या ट्रक चालकाने तातडीने ट्रक मालक विलास ढेंगरे यांना या घटनेची माहिती दिली. ढेंगरे यांनी तात्काळ नवी मुंबईच्या रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली.
वादग्रस्त आणि निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या आईचा आणखी एक प्रताप पुढे आला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मुलुंड ते ऐरोली रोडवरील ऐरोली हद्दीतील सिग्नलवर प्रल्हाद कुमार वय 22 राहणार तुर्भे… pic.twitter.com/61ZzrvHAl0
— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) September 14, 2025
पोलिसांचा तपास आणि धक्कादायक उलगडा
तक्रार दाखल होताच नवी मुंबई पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात आणि त्यांच्या टीमने MH 12 RP 5000 या कारचा मागोवा घेत थेट पुण्यातील चतुश्रृंगी परिसरातील पूजा खेडकर यांच्या घरापर्यंत पोहोचले. पोलिसांनी घराचा दरवाजा ठोठावला असता, खेडकर यांच्या आईने गेट उघडण्यास नकार दिला आणि पोलिसांशी हुज्जत घातली.
मात्र, पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती करत चौकशी सुरूच ठेवली. काही वेळाने पोलिसांना घरातूनच ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमारची सुटका करण्यात यश आले.
खेडकर कुटुंबाच्या अडचणीत वाढ
या प्रकरणामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अपहरण झालेला हेल्पर खेडकर कुटुंबाच्या घरात कसा पोहोचला? अपघातात वापरलेली कार त्यांच्या ताब्यात कशी आली? अपघातातील आरोपींचा खेडकर कुटुंबाशी नेमका काय संबंध आहे? या सर्व बाबींची चौकशी नवी मुंबई पोलीस करत आहेत. यापूर्वीही विविध वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत राहिलेल्या खेडकर कुटुंबाच्या अडचणीत या नव्या प्रकरणामुळे अधिक भर पडली आहे.
हे देखील वाचा – Nitin Gadkari: ‘माझ्या मेंदूची किंमत 200 कोटी रुपये आहे’; इथेनॉल वादावर नितीन गडकरींचे प्रत्युत्तर