कोल्हापुरी चप्पल वाद: प्राडाविरोधात न्यायालयात याचिका दाखल, कारागिरांना भरपाईची मागणी

Prada Kolhapuri Chappal

Prada Kolhapuri Chappal | इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड प्राडाने (Prada) कोल्हापुरी चप्पलांपासून (Kolhapuri Chappal) प्रेरित टो रिंग सँडल्स सादर केल्याने निर्माण झालेला वाद आता चिघळला आहे. या प्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

प्राडावर जीआय-टॅग्ड कोल्हापुरी चप्पल डिझाइनच्या अनधिकृत वापराचा आरोप करत कारागिरांना नुकसानभरपाई आणि सार्वजनिक माफीची मागणी करण्यात आली आहे. प्राडाने यापूर्वी आपल्या मेन्स 2026 फॅशन शोमध्ये सादर केलेल्या सँडल्स भारतीय हस्तकलेपासून प्रेरित असल्याचे मान्य केले, परंतु याचिकेत त्यांचे निवेदन अपुरे असल्याचे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी मिलान येथील प्राडा मेन्स 2026 फॅशन शोमध्ये सादर केलेल्या टो रिंग सँडल्सची किंमत 1 लाख रुपये होती. या सँडल्सचे डिझाइन महाराष्ट्रातील जीआय-टॅग्ड कोल्हापुरी चप्पलांशी साम्य असल्याचा आरोप आहे. यामुळे सोशल मीडियावर कंपनीवर तीव्र टीका झाली.

प्राडाने निवेदनात सँडल्स भारतीय हस्तकलेपासून प्रेरित असल्याचे कबूल केले.परंतु याचिकेत त्यांना युरोपियन लेबलखाली रिब्रँडिंग आणि अनधिकृत व्यावसायिक शोषणाचा आरोप आहे.

प्राडाविरोधात जनहित याचिका दाखल

या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. याचिकेत प्राडावर चुकीची माहिती, सांस्कृतिक चोरी आणि कोल्हापुरी चप्पलांचे अनधिकृत व्यावसायिक शोषण केल्याचा आरोप आहे. यामुळे महाराष्ट्रातील कारागिरांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा आहे. याचिकेत प्रतिबंधात्मक आदेश, नुकसानभरपाई आणि सार्वजनिक माफीची मागणी करण्यात आली आहे. तसेच, जीआय-टॅग्ड उत्पादनांसाठी कठोर संरक्षणाची मागणीही केली आहे.

प्राडाचे निवेदन

प्राडाचे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रमुख लॉरेन्झो बर्टेली यांनी सँडल्स भारतीय हस्तकलेपासून प्रेरित असल्याचे मान्य केले आहे. त्यांनी डिझाइन प्रारंभिक टप्प्यात असून, अद्याप उत्पादनासाठी मंजूर नसल्याचे सांगितले. मात्र, याचिकेत प्राडाचे निवेदन टीकेपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.