Prithviraj Chavan : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा देशाच्या राजकारणाबद्दल मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, येत्या 19 डिसेंबर रोजी देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल आणि देशाचा पंतप्रधान बदलला जाईल. विशेष म्हणजे, पंतप्रधान होणारी व्यक्ती मराठी माणूस असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पिंपरी-चिंचवड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याच्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा पुन्हा एकदा अधोरेखित केला. त्यांनी मागील ट्वीटचा आणि अमेरिकेतील नवीन कायद्याचा दाखला देत सांगितले की, हा बदल झाल्यास काँग्रेसचा माणूस पंतप्रधान होणार नाही, कारण त्यांच्याकडे तेवढे बहुमत नाही. त्यामुळे सत्तेत असलेल्या लोकांपैकीच कोणीतरी होईल आणि तो कदाचित मराठी माणूस असू शकतो. त्यांनी नागपुरातील भाजपच्या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यताही व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे उत्तर
पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पुणे दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अत्यंत मार्मिक शब्दांत प्रतिक्रिया दिली.
“आत्तापर्यंत वेगवेगळ्या लोकांना साक्षात्कार होत होते आणि ते भविष्यवाणी करत होते, हे सर्व आम्ही पाहिलेले आहे,” असे फडणवीस म्हणाले. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत, त्यांनाही अशा प्रकारचे साक्षात्कार व्हायला लागले, म्हणजे निश्चितच यात काहीतरी ‘काळंबेरं’ असेल. “पृथ्वीराज चव्हाण यांचे आरोग्य चांगले राहावे, अशा आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, पण त्यांनी असा विचार करून स्वतःला फार त्रास करून घेऊ नये,” असा सल्लाही त्यांनी दिला.
राधाकृष्ण विखे पाटलांकडून तीव्र टीका आणि खिल्ली
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका करत त्यांची खिल्ली उडवली. विखे पाटील यांनी चव्हाण यांना “संपलेली आवृत्ती” असे संबोधले.
विखे पाटील म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण हे शिळ्या कढीला ऊत आणून स्वतःला महत्त्व मिळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा केली होती, ती या पृथ्वीराज चव्हाण यांनी मनावर घेतली आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करून दाखवला,” असा टोलाही त्यांनी लगावला. ज्या नेत्याला त्यांच्या स्वतःच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत पॅनल उभा करता आले नाही, त्यांच्या वक्तव्याला किती गांभीर्याने घ्यायचे, असा सवाल करत त्यांनी या दाव्याची उपेक्षा केली.









