‘भगवा दहशतवाद नको, हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा’, मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर पृथ्वीराज चव्हाण यांची जोरदार टीका

Prithviraj Chavan on Malegaon Blast Verdict

Prithviraj Chavan on Malegaon Blast Verdict: मालेगाव बॉम्बस्फोट (Malegaon Blast Verdict) प्रकरणात न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan on Malegaon Blast Verdict) यांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना तपास यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत.

“आरोपी निर्दोष सुटले नाहीत, तर पुराव्यांअभावी त्यांची सुटका झाली आहे. हा तपास यंत्रणेचा मोठा पराभव आहे.”, अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली.

या निकालावर बोलताना चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर थेट निशाणा साधला. “अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली तपास यंत्रणा काम करत असल्यामुळे अशाच निकालाची अपेक्षा होती,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

‘भगवा दहशतवाद नको, हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा!’

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी “भगवा दहशतवाद” (Saffron Terrorism) हा शब्दप्रयोग वापरण्यावर आक्षेप घेतला. ते म्हणाले, “माझी हात जोडून विनंती आहे की, भगवा दहशतवाद हा शब्द वापरू नका. भगवा रंग हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि वारकऱ्यांच्या झेंड्याचा रंग आहे. त्यामुळे त्याचा वापर दहशतवादासाठी करू नये. त्याऐवजी हिंदुत्ववादी दहशतवाद किंवा सनातनी दहशतवाद म्हणा.” काँग्रेस कार्यकर्त्यांनाही त्यांनी हा शब्द वापरू नये असे आवाहन केले.

‘पहिला दहशतवादी नथुराम गोडसे’

याच संदर्भात चव्हाण यांनी “सर्वात पहिला दहशतवादी नथुराम गोडसे (Nathuram Godse) होता,” असे म्हणाले. “गोडसे कोणत्या पक्षाचा होता? तो हिंदुत्ववादीच होता ना?” असा सवाल करत त्यांनी भाजपने विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांना गुंतवून टाकल्याचा आरोप केला.

चव्हाण पुढे म्हणाले, “स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना तुम्ही काय सांगणार? ज्यांना सोडलं त्यांचा सत्कार होईल, हारतुरे घातले जातील, पण ज्यांचा मृत्यू झाला त्या कुटुंबांचं काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.