जुन्नरमध्ये १२०० फूट खोल दरीत तलाठी आणि तरुणीचा मृतदेह

Pune Crime: Bodies Of 40-Year-Old Government Official And 20-Year-Old College Studen

पुणे– पुण्यातील (pune जुन्नरजवळ दुर्गम आदिवासी भागात असलेल्या कोकणकडा परिसरात १२०० फूट खोल दरीत दोन मृतदेह आढळले. यात एका तरुणीचा आणि पुरुषाचा समावेश आहे. रमेश सूर्यवंशी (४०) आणि रूपाली (२२) अशी या दोघांची नावे आहेत. रमेश हे श्रीगोंद्यात तलाठी म्हणून कार्यरत होते तर रुपाली महाविद्यालयात शिकत होती. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

जुन्नर पोलीस (police)ठाण्याचे निरीक्षक संदीप गायकवाड यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पोलीस आणि स्थानिक बचाव पथकाने अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत दरीत उतरून दोन्ही मृतदेह बाहेर काढले. रमेश मूळचे दुर्गावाडीचे रहिवासी होते. सध्या ते श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून ते बेपत्ता होते. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. रूपालीदेखील काही दिवसांपासून बेपत्ता होती. याबाबत जुन्नर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, कोकणकडा परिसरातील रिव्हर्स धबधब्याजवळ काही दिवसांपासून एक पांढरी कार उभी असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. संशय बळावल्याने त्यांनी परिसराची पाहणी केली, कड्याच्या काठावर एक पुरुष आणि एक स्त्री यांच्या चपला आढळल्या. रविवार २२ जूनला दाट धुके आणि पावसामुळे शोधकार्याला अडथळा आला. मात्र काल सकाळच्या सुमारास बचाव पथकाने दरीत उतरून शोध घेतला, तेव्हा दोन मृतदेह आढळले. बचाव पथक आणि पोलिसांनी हे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले.