‘पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवेंचे नाव द्या’, भाजप खासदाराची मागणी; संभाजी ब्रिगेडकडून जोरदार विरोध

Pune Railway Station Renaming Controversy

Pune Railway Station Renaming Controversy | पुणे रेल्वे स्टेशनला ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ यांचे नाव देण्याची मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर आता रेल्वे स्टेशनच्या नावावरून वाद पेटण्याची शक्यता आहे. मेधा कुलकर्णींच्या मागणीनंतर अनेक संघटनांनी ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले’ यांचे नाव सुचवले आहे.

बाजीराव पेशव्यांचे नाव देण्याची मागणी

पुणे आणि सोलापूर रेल्वे विभागाच्या बैठकीत खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाच्या नामकरणाचा मुद्दा मांडला. त्यांनी सांगितले की, पुणे हे शिक्षण, संस्कृती आणि आयटी हब म्हणून ओळखले जाते, आणि स्थानकाचे नाव शहराच्या समृद्ध इतिहासाचे प्रतिनिधित्व करणारे असावे. थोरले बाजीराव पेशवे यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार ‘अटक ते कटक’पर्यंत केला आणि 42 लढायांमध्ये अपराजित राहिले. त्यांचे युद्धकौशल्य राष्ट्रीय संरक्षण अकादमीत शिकवले जाते. त्यांचे नाव स्थानकाला दिल्यास नव्या पिढीला इतिहासाची प्रेरणा मिळेल, असे कुलकर्णी म्हणाल्या.

महात्मा फुले यांच्या नावाची मागणी

कुलकर्णी यांच्या मागणीला विरोध करत अनेक संघटनांनी स्थानकाला ‘महात्मा ज्योतिराव फुले’ यांचे नाव देण्याची मागणी केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात गट) अध्यक्ष सचिन खरात यांनी पेशवे यांच्या नावाला विरोध दर्शवला. त्यांनी सांगितले की, पेशव्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची ‘राज्याभिषेक शक’ बंद केली, तर महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून जयंती साजरी केली. फुले यांनी स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणांसाठी केलेले कार्य पुण्याला ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळख देणारे आहे, त्यामुळे त्यांचे नाव स्थानकाला द्यावे, असे खरात म्हणाले.

संभाजी ब्रिगेडनेही फुले यांच्या नावाला पाठिंबा दिला. त्यांनी म्हटले की, पुण्याची ‘विद्येचे माहेरघर’ ही ओळख फुले यांच्यामुळे आहे आणि ‘आधुनिक पेशवाई’ला ते विरोध करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी महात्मा फुले किंवा गोपाळ कृष्ण गोखले यांचे नाव सुचवले आहे.

Share:

More Posts