Rahul gandhi- एसआयआर आणि मतचोरी विरोधात दिल्लीच्या रामलीला मैदानावर आज काँग्रेसची एक मोठी सभा झाली. यावेळी बोलताना राहुल गांधींनी (Rahul gandhi) केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदींचा आत्मविश्वास उडाला आहे. अमित शहांचे हात थरथर कापत आहेत. त्यांना माहीत आहे की ते चोरी करताना पकडले गेले आहेत.
दिल्लीच्या रामलीला मैदानावर काँग्रेस पक्षाची ‘वोट चोर गद्दी छोड़’ ही रॅली आज झाली. यावेळी राहुल गांधी अतिशय आक्रमकपणे बोलले. राहुल गांधी यांनी आरोप केला की, मोदी व शहा वोटचोरी करून निवडणूक जिंकतात. संपूर्ण देशाला हे सत्य कळले आहे. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, सुखबीर सिंग आणि विवेक जोशी हे भाजपाशी संगनमत करून काम करत आहेत. पंतप्रधानांनी त्यांच्यासाठी कायदा बदलला आहे. आम्ही सत्तेवर आलो तर आम्ही हा कायदा बदलू आणि या लोकांवर कारवाई करू. आपण निवडणूक आयुक्त आहोत, भाजपाचे कार्यकर्ते नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, आमची विचारसरणी, भारताची, हिंदू धर्माची आणि जगातील प्रत्येक धर्माची विचारसरणी म्हणते की सत्य सर्वात महत्त्वाचे आहे. मी इथे येत असताना मला सांगण्यात आले की मोहन भागवत यांनी अंदमान आणि निकोबार बेटावर काल एक विधान केले. गांधीजी म्हणायचे की सत्य ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपल्या धर्मात सत्य ही सर्वात महत्त्वाची गोष्ट मानली जाते. पण मोहन भागवत म्हणतात की, सत्याला काही अर्थ नाही, शक्ती महत्त्वाची आहे. मी तुम्हाला खात्री देतो की, सत्य स्वीकारून आणि सत्याच्या पाठीशी उभे राहून आपण नरेंद्र मोदी, अमित शहा, संघ यांचे सरकार सत्तेवरून उतरवू. याला वेळ लागू शकतो, पण भारतात सत्याचा विजय होईल.
आपण सत्याच्या मार्गावर चालू आणि त्यांना सत्तेवरून हाकलून लावू. पंतप्रधान मोदींना हे लक्षात आल्याने त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. त्यांची मतांची चोरी पकडली गेली आहे. मतांची चोरी हा भारतीय संविधानावरचा सर्वात मोठा हल्ला आहे. जर त्यांनी मते चोरली नसती तर जनतेने त्यांना पाच मिनिटांत सत्तेवरून हाकलून लावले असते. या सभेला काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, प्रियांका गांधी उपस्थित होत्या. काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ‘मोदी-शहा वोटचोर वोटचोर’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
—————————————————————————————————————————————————–
हे देखील वाचा –
मेस्सी दौरा आयोजकाला १४ दिवसांची पोलीस कोठडी
काशीच्या अन्नपूर्णा मंदिरात आता १ वर्षांच्या बाळांना ‘दूध प्रसाद’
मुंबईच्या तिजोरीवर डाका टाकणाऱ्या रेहमान डकैतवर महायुती धुरंधर ठरणार ! एकनाथ शिंदेंची टीका









