Raj Thackeray on Operation Sindoor | पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने (Indian Army) पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नसून, दहशतवाद्यांना शोधून काढणे आणि सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त के आहे.
भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही. अमेरिकेत ट्विन टॉवर पाडले आणि पेंटॅगॉनवर हल्ला झाला, तेव्हा अमेरिकेने युद्ध न करता त्या दहशतवाद्यांना शोधून ठार मारले. त्यामुळे दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे प्रत्युत्तर असू शकत नाही.
ते पुढे म्हणाले की, “ज्या दहशतवाद्यांनी तो हल्ला केला, ते तुम्हाला अजून सापडलेले नाहीत. जिथे हजारो पर्यटक जातात, तिथे सुरक्षा यंत्रणा का नव्हती? हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत. आपल्या देशात कोम्बिंग ऑपरेशन करून यांना शोधून काढणे गरजेचे आहे. एअर स्ट्राईक करून, लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवून युद्ध करणे हा काही पर्याय होऊ शकत नाही.” ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव भावनांचा विषय नाही, तर तुम्ही नेमकी काय पावले उचलताय हे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावरही निशाणा साधला. ‘ज्यावेळी पहलगाममध्ये हल्ला झाला, त्यावेळी पंतप्रधान सौदी अरेबियामध्ये होते. त्यांनी तो दौरा अर्धवट सोडला आणि परत येऊन बिहारमध्ये प्रचाराला गेले. त्यानंतर ते केरळमध्ये (Kerala) अदानींच्या पोर्टचे उद्घाटन करायला गेले आणि नंतर चित्रपट उद्योगातील एका कार्यक्रमात सहभागी झाले. इतकी गंभीर परिस्थिती असताना या गोष्टी टाळता आल्या असत्या, असे खडे बोल त्यांनी सुनावले.
देशभरात मॉक ड्रिल (Mock Drill) करण्याऐवजी दहशतवाद्यांना शोधण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन करायला हवे. आपल्या देशातील पोलीस दल आणि सुरक्षा यंत्रणा सक्षम आहेत. मुंबई पोलिसांनी यापूर्वीही चांगलं काम केलं आहे, असे राज ठाकरे म्हणाले. आज देशातील प्रश्न संपत नाहीत आणि आपण युद्धाला सामोरे जात आहोत, हे योग्य नाही. नाक्या-नाक्यावर ड्रग्स (Drugs) मिळत आहेत, ते कुठून येत आहेत आणि लहान मुले ड्रग्स घेत आहेत, याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. युद्ध हे या प्रश्नाचे उत्तर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तान आधीच बरबाद झालेला देश आहे, त्याला आणखी काय बरबाद करणार, असेही ते म्हणाले.