Raj Thackeray Letter to Devendra Fadnavis : नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक अत्यंत गंभीर पत्र लिहिले आहे. राज्यातील लहान मुले पळवण्याच्या टोळ्या आणि मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या प्रमाणावर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
बेपत्ता होणाऱ्या मुलांची वाढती आकडेवारी आणि टोळ्यांवर सवाल
राज ठाकरे यांनी आकडेवारीचा दाखला देत हा प्रश्न किती गंभीर आहे, हे अधोरेखित केले आहे. एनसीआरबीच्या (NCRB) आकडेवारीनुसार, सन 2021 ते 2024 या काळात लहान मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण जवळपास 30 टक्क्यांनी वाढले आहे. लहान मुलांना पळवून त्यांना कामाला जुंपणाऱ्या किंवा भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्यीय टोळ्या (Interstate Gangs) राज्यात सर्रासपणे कार्यरत आहेत, मात्र यावर सरकारची ठोस कारवाई दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
फक्त ‘अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुले परत शोधली जातात’ असे थातुरमातुर सरकारी उत्तर महाराष्ट्राला नको आहे. समजा मुले सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचे काय? टोळ्या कार्यरतच कशा होतात आणि त्या इतक्या राजरोसपणे काम कशा करतात, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांसाठी डीएनए तपासणीची मागणी
राज ठाकरे यांनी रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेबद्दलही प्रश्न उपस्थित केला. आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर आणि बसस्टँडवर भीक मागणारी लहान मुले बघतो, ती कोण आहेत? त्यांच्यासोबत असणारे लोक खरे पालक आहेत का? याचा तपास व्हायला हवा. वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाहीत, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
प्रति,
— Raj Thackeray (@RajThackeray) December 13, 2025
श्री. देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
सस्नेह जय महाराष्ट्र,
एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं…
अधिवेशनाच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह आणि केंद्रावर हल्लाबोल
राज ठाकरे यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या उपयुक्ततेवरही संताप व्यक्त केला. आज या राज्यात लहान मुले पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत, यावर विधिमंडळात चर्चा व्हावी आणि प्रशासनाला ठोस पाऊले उचलायला भाग पाडावे असे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का?
हिवाळी अधिवेशन म्हणजे केवळ सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय आहे का, असा सवाल त्यांनी केला. अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात उपस्थित नसतात, अशा परिस्थितीत लहान मुलांच्या गायब होण्याच्या विषयावर चर्चा होईल अशी अपेक्षा करणे अवाजवी (Unreasonable) वाटते, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृती गट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असे वाटत नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.
मनसे अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना गृहमंत्री या नात्याने या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून, केवळ अधिवेशनात चर्चा न करता ठोस कृती करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या पत्राला काय प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
हे देखील वाचा – H3N2 Influenza : H3N2 इन्फ्लुएन्झा काय आहे? हिवाळ्यात आजारांपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी? जाणून घ्या









