मुंबई -उबाठा (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सोबतच्या युतीसंदर्भात मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeay) हे विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर विचार करणार असल्याचे वृत्त काही प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केले होते. मात्र अनौपचारिक गप्पांमध्ये मी असे काही बोललो नाही, मला राजकीय विधान करायचे असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन असे म्हणत राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमातील पत्रकारांना खडे बोल सुनावले आहेत. हा कोणता पत्रकारितेचा प्रकार आहे? युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का? असा प्रश्नदेखील त्यांनी विचारला.
राज ठाकरे एक्स (X) पोस्ट करत म्हणाले की, 14 आणि 15 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला. त्या दरम्यान मला 5 जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारले असता, मी तो मेळावा राजकीय नव्हता, तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता असे उत्तर दिले. त्यानंतर युतीबाबत विचारणा झाली असता, मी स्पष्टपणे म्हटले की, युतीच्या चर्चा तुमच्यासोबत करायच्या का आता? त्यावरून काल काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रांनी आणि निवडक माध्यमांनी, मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले की, युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल. ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे? अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या असतात आणि त्यातले काही प्रसिद्ध केलेच तर जे बोलले नाही ते समोरच्याच्या तोंडात घालायचे नसते हे भान पण आता गेले आहे का? कोणाच्यातरी आहारी जाऊन किंवा सांगण्यावरून पत्रकारिता करायची हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडला आहे, हे आमच्या लक्षात येत नाही असे समजू नका. तुम्हाला किंवा कोणाला काहीतरी रोज नवनवीन बातम्या हव्या म्हणून आम्ही सतत बोलत राहावे का? आणि काही मिळाले नाही तर तयार बातम्या करा. हा पत्रकारितेचा कोणता प्रकार आहे? आमचा 1984 पासून पत्रकारितेचा संबंध आहे. आमच्या घरातच साप्ताहिके, नियतकालिके, वर्तमानपत्रे सुरू झाली. पत्रकारितेचे खूप जवळून निरीक्षण केले आहे. त्यामुळे पत्रकारिता काय असते, याची मला पूर्ण कल्पना आहे . त्यामुळे काही मोजक्या पत्रकारांना आणि त्यांच्या संपादकांना माझी विनंती आहे की, हे असले प्रकार करू नका. मला जर कोणतेही राजकीय विधान करायचे असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन.
