महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ राज्यगीत म्हणणे बंधनकारक, अंमलबजावणी न केल्यास होणार कारवाई

Rajyageet Garja Maharashtra Majha Mandatory In Schools

Rajyageet Garja Maharashtra Majha Mandatory In Schools: महाराष्ट्रातील सर्वच माध्यमांच्या शाळांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील प्रत्येक शाळेत राष्ट्रगीतानंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत (Rajyageet) म्हणणे बंधनकारक असेल.

जो कोणी या निर्णयाची अंमलबजावणी करणार नाही, त्या शाळांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. त्यामुळे आता मराठीसह इंग्रजी, हिंदी आणि इतर माध्यमांच्या शाळांमध्येही राज्यगीत म्हणणे बंधनकारक असेल.

शिष्यवृत्ती परीक्षांचा विस्तार

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याबाबतही एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. पूर्वी इयत्ता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जात होत्या. त्यानंतर 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठीही या परीक्षा सुरू झाल्या. आता इयत्ता 4थी, 5वी, 7वी आणि 8वी या सर्व वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेऊन शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी ‘हेल्थ कार्ड’

उच्च दर्जाच्या शिक्षणासोबतच आता विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजीही शालेय शिक्षण विभाग घेणार आहे. यापूर्वी होणारी आरोग्य तपासणी केवळ औपचारिक असायची, पण आता पालकांच्या उपस्थितीत आरोग्य पथकामार्फत विद्यार्थ्यांची तपासणी केली जाईल. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला एक ‘हेल्थ कार्ड’ दिले जाईल, जे त्यांना भविष्यात अनेक ठिकाणी उपयोगी पडेल, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली.