Raosaheb Danve on Uddhav Thackeray : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर भाष्य करताना दानवे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी जेव्हापासून हिंदुत्वाची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली, तेव्हापासूनच त्यांचा पक्ष संपायला सुरुवात झाली होती. आगामी महापालिका निवडणूक ही त्यांची शेवटची निवडणूक ठरेल आणि त्यानंतर त्यांच्याकडे एकही कार्यकर्ता उरणार नाही.
‘मागच्या वेळी आमचाच महापौर बसला असता’
मुंबई महापालिकेच्या राजकारणाबाबत बोलताना दानवे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, गेल्या निवडणुकीच्या वेळी मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष होतो. त्या निवडणुकीत भाजपच्या इतक्या जागा निवडून आल्या होत्या की आम्ही आमचा महापौर बसवू शकलो असतो. मात्र, त्यावेळी आम्ही एकत्र सरकार चालवत होतो, त्यामुळे आमच्या नेतृत्वाने मोठेपण दाखवत महापालिका त्यांच्याकडेच राहू दिली. अन्यथा, मुंबई महानगरपालिकेत गेल्याच वेळी भाजपची सत्ता आली असती, असा खळबळजनक दावा त्यांनी केला.
ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर विचारले असता दानवे म्हणाले की, निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंचा पक्ष अस्तित्वात राहणार नाही. कार्यकर्ते आपले भविष्य शोधण्यासाठी दुसऱ्या पक्षात जातील. काही कार्यकर्ते राज ठाकरेंचे नेतृत्व स्वीकारतील, तर काही इतर पक्षांत जातील. शेवटी पक्षात फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोनच लोक उरतील. कार्यकर्त्यांमध्ये आता आपला पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास उरलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.
माणिकराव कोकाटे आणि नवाब मलिक यांची तुलना
मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल बोलताना दानवे यांनी महायुती सरकारची पाठ थोपटली. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, हे आमच्या सरकारने दाखवून दिले आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांचा संदर्भ देत टीका केली की, मलिक तुरुंगात गेल्यानंतरही त्यांनी राजीनामा दिला नव्हता, मात्र कोकाटे यांनी निकाल लागताच नैतिकतेने राजीनामा दिला. जे काही झाले ते नियमानुसारच झाले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सुप्रिया सुळेंच्या उपोषणावर टोला
खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आंदोलनाबाबत बोलताना दानवे म्हणाले की, गेल्या 75 वर्षांत त्यांनी कधीच उपोषण केले नव्हते. मात्र, आता त्यांच्यावर उपोषण करण्याची वेळ आली आहे आणि भविष्यात त्यांच्यावर अशी वेळ अनेकदा येणार आहे. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.









