Maharashtra First Robotics AI Education School: सध्याच्या काळात एआयचा वापर वाढला आहे. त्यामुळे मुलांना लहानपणापासूनच अधिकाधिक तंत्रज्ञानभिमुख शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. भविष्यातील तंत्रज्ञानाचे धडे आजच गिरवण्यासाठी महाराष्ट्रातील एका जिल्हा परिषद शाळेने अनोखा पुढाकार घेतला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील केळशी गावातील जिल्हा परिषद शाळा क्र. 1 ने महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात नवा आदर्श निर्माण केला आहे. ही शाळा राज्यातील पहिली शाळा ठरली आहे जिथे रोबोटिक्स, कोडींग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) शिकवली जाते. नुकतेच येथे एका अद्ययावत ‘ईआय टिंकर लॅब’चे उद्घाटन करण्यात आले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर नव्या युगाचे दालन खुले झाले आहे. (Maharashtra First Robotics AI Education School)
स्काय रोबोटिक्सचा उपक्रम आणि स्थानिक सहभाग
पुण्यातील स्काय रोबोटिक्स या संस्थेच्या पुढाकारातून ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. रोबोटिक्स आणि एआय शिकवण्याची संकल्पना कशी राबवली जाईल याचे प्रात्यक्षिक गायत्री परांजपे यांनी दिले. त्यांनी केळशी गावासाठी पुणेतील नोकरी सोडून येथे येऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
कोकणात आधुनिक शिक्षणाची सुरुवात
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील 17 शाळांमध्ये स्काय रोबोटिक्सने अशाच प्रयोगशाळा सुरू केल्या असून, आता कोकणातील प्राथमिक शाळांपर्यंतही आधुनिक तंत्रज्ञान पोहोचू लागले आहे. केळशी शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंत शिकणाऱ्या 115 विद्यार्थ्यांसाठी 10 अद्ययावत संगणकांसह प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीही आता रोबोटिक्स आणि एआयचे प्राथमिक धडे गिरवत आहेत.
गेल्या वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्यात सुरू झालेल्या या उपक्रमामुळे आता केवळ माध्यमिक नव्हे तर प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठीही डिजिटल शिक्षणाची नवी वाट खुली झाली आहे. दापोलीतील गतीमंद विद्यालयातील विद्यार्थीदेखील यामध्ये सहभागी होत आहेत. हा प्रयत्न ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भविष्याच्या तंत्रज्ञानासाठी तयार करत आहे.