leopard News : बिबट्याला पाळीव प्राण्याचा (leopard News) दर्जा द्या, अशी अजब मागणी आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी केली. सरकार साथ द्यायला तयार असेल तर मी बिबट्या पोसायला सर्वप्रथम तयार आहे असेही त्यांनी सांगितले.
राणा म्हणाले की, सध्या बिबट्या विविध ठिकाणी प्रवेश करत असल्याच्या बातम्या येत आहेत.बिबट्याची संख्या वाढत आहे. एकीकडे बिबट्यासारखे खतरनाक विविध जातीचे कुत्रे (Dog) आपण घरात पाळताना पाहतो. त्यामुळे पाळीव प्राण्यामध्ये बिबट्याचासुद्धा समावेश केला पाहिजे. त्याचा पाळीव प्राण्यात समावेश केला तर त्याच्यावर नसबंदी करण्याची वेळ येणार नाही. लहानपणापासून जर बिबट्याचे पालनपोषण, वनतारामध्ये प्रत्येक प्राण्याचे केले जाते तसे, तशा पद्धतीने केले तर बिबट्या माणसाळेल. बिबट्यासारख्या प्राण्याला पाळीव प्राण्याचा दर्जा देऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याला सुरक्षित ठेवता येईल. विदेशात वाघ-सिंहासारखे प्राणी पाळले जातात. त्या दर्जाचे प्राणी न पाळता बिबट्यासारख्या मनुष्य वस्तीत वावरणाऱ्या प्राण्याला लहानपणापासून पाळले तर त्याच्यावर नसबंदीची वेळ येणार नाही. सरकारने याकामी मदत केली पाहिजे.
यावर शरद पवार गटाचे जयंत पाटील म्हणाले की, हे सरकार कुत्रे पकडू शकत नाही, मग बिबटे काय पकडणार? रवी राणा बिबट्यांना पाळण्याची मागणी करत आहे, यावरून सत्ताधाऱ्यांची दिवाळखोरी दिसून येत आहे.
जयंत पाटील यांच्या या उपरोधिक टीकेबद्दल भाजपा नेते सुधीर मुनगंटीवर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी असे कधी कधी बोलावे लागते असे म्हणत रवी राणांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला.
सांगलीत घरात घुसलेला बिबट्या अखेर जेरबंद
सांगली जिल्ह्यातील शिवरवाडी येथे नवीन बांधकामाच्या घरात घुसलेल्या बिबट्याला वन विभाग व रेस्क्यू टीमने दीड तासाच्या प्रयत्नानंतर जेरबंद केले.

शिवरवाडीतील अशोक बेंद्रे यांच्या घराचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. दोन दिवसापूर्वी या दरवाजा नसलेल्या घरात बिबट्या असल्याचे लक्षात आल्यावर त्याला हुसकावून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु आज सकाळी सात वाजता, बेंद्रे नळाचे पाणी भरण्यासाठी घरात गेले असता त्यांना बिबट्या तिथेच बसलेला आढळला. त्यानंतर त्यांनी घराच्या उत्तर व पश्चिम दरवाज्यांना पत्र्याच्या पानांनी बंद करून वन विभाग शिराळा यांना तात्काळ माहिती दिली. काही वेळानंतर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी लोखंडी सापळा आणि जाळीसह घटनास्थळी पोहोचले. सुरवातीला घराच्या एका चौकटीत लोखंडी सापळा लावून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न झाला, परंतु बिबट्याने त्याला दाद दिली नाही. अखेर बांबू, चिवे व काठ्यांच्या सहाय्याने दीड तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला सापळ्यात जेरबंद करण्यात आले. सापडलेला बिबट्या चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार आहे.









