बीड – भाजपाचे (BJP) आष्टीचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा जवळचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले (Satish Bhosale) याचा जामीन अर्ज शिरूर कासार येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी मंजूर केला. हा जामीन वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणात मंजूर झाला. मात्र त्याच्यावर इतर गुन्हे असल्याने त्याची जेलमधून (jail) मुक्तता होणार नाही .
सतीश भोसले उर्फ खोक्या याच्यावर एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला बॅटने मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. बीडच्या शिरूर परिसरातील दिलीप ढाकणे आणि त्याचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याप्रकरणीही त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर पाटोदा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी ८ मार्च रोजी खोक्याच्या घरावर छापा टाकून वन्यप्राण्यांच्या शिकारीचे साहित्य, प्राण्यांचे मांस व गांजा जप्त केला होता. त्यानंतर त्याला अटक झाली होती. वन्य जीवांचे मांस आढळून आल्याने त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात तो न्यायालयीन कोठडीत होता. याच गुन्ह्यात आता त्याला जामीन मंजूर झाला आहे.