मुंबई- माध्यमांमधून आलेल्या राजीनाम्याच्या बातम्या खोट्या आहेत, माध्यमे या बातम्या का देत असतात असे म्हणणारे व आपली निष्ठा अद्यापही शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बरोबरच आहे असे छातीठोकपणे सांगणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अखेर आज पायऊतार झालेच. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या जागी शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) हे नवे प्रदेशाध्यक्ष जाहीर झाले . आता त्यांची भाजपात (BJP) जाण्याची बातमी खरी ठरल्यानंतर शरद पवारांनाही ब्रुट्स यु टू असेच म्हणावे लागणार आहे.
शरद पवार पक्षात फूट पाडून अजित पवार यांनी आपलाच पक्ष खरा राष्ट्रवादी आहे असा दावा केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे अनेक महत्त्वाचे नेते त्यांच्याबरोबर गेले व नंतर भाजपा बरोबर सत्तेत सहभागी झाले. प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील मात्र अजित पवार यांच्याबरोबर गेले नव्हते. ते आज ना उद्या त्यांच्याबरोबरच जाणार अशी अटकळ मांडली जात होती. जयंत पाटील त्यांनाही ओलांडून थेट भाजपात जाणार अशी बराच काळ चर्चा सुरू आहे. सत्ताधारी पक्षानेही जयंत पाटील यांच्यासाठी एक मंत्रीपद राखून ठेवले असल्याचे वारंवार म्हटले होते. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांचे म्हणणे खरे होऊन जयंत पाटील हे थेट भाजपात जातात का? व कधी जातात ?एवढाच प्रश्न शिल्लक आहे. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांसाठी व विरोधकांना चिमटे घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले जयंत पाटील यांचे भाजपात नेमके स्थान काय राहिल अशी चर्चा सुरु आहे. भाजपात त्यांच्यासारख्या योग्यतेचा एकही नेता नसल्याने त्यांच्या येण्याचे भाजपा खरोखरच स्वागत करील का असाही प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे जयंत पाटील पायउतार होत आहेत याची आपल्याला काहीच माहिती नाही असा आव सुप्रिया सुळे कालपर्यंत आणत होत्या.