Sheetal Tejwani : पुण्यातील मुंढवा येथील 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य आरोपी असलेली शीतल तेजवानी आणखी एका वादामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. या जमीन घोटाळ्याचा तपास सुरू असतानाच, तिने यापूर्वी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरवर भाडेकरार भंग केल्याचा आरोप करून पुणे दिवाणी न्यायालयात ₹50 लाखांहून अधिक रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा दाखल केल्याचे उघडकीस आले आहे.
रणबीर कपूरच्या फ्लॅटचा वाद काय आहे?
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याचे पुण्यातील कल्याणी नगर भागातील प्रतिष्ठित ट्रम्प टॉवर्समध्ये आलिशान फ्लॅट आहेत. 2018 मध्ये हा वाद निर्माण झाला होता. शीतल तेजवानी हिने दावा केला होता की, रणबीर कपूरने भाडेकरारातील अटींचे उल्लंघन केले. करारात नमूद केलेला लॉक-इन कालावधी पूर्ण होण्याआधीच तिला कोणतीही पूर्वकल्पना न देता घरातून बेकायदेशीररित्या बाहेर काढण्यात आले.
या प्रकरणी तेजवानीने ₹50 लाख 40 हजार रुपये नुकसानभरपाई आणि त्यावरील व्याजाची मागणी केली होती. हा खटला पुणे दिवाणी न्यायालयात अद्यापही प्रलंबित आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 05 जानेवारी 2026 रोजी होणार आहे.
शीतल तेजवानीचे जमीन घोटाळा प्रकरण
शीतल तेजवानीवर मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारात सहभागी असल्याचा गंभीर आरोप आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी घेतलेल्या जमिनीच्या व्यवहारात ती मुख्य आरोपी आहे. महाराष्ट्र शासनाच्या नावावर नोंद असलेल्या महार वतनाच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी तिने खोटी कागदपत्रे तयार केल्याचाही आरोप आहे.
या घोटाळ्याचा तपास सुरू असताना ती अनेक दिवस फरार होती. यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे आणि सध्या ती 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनी केले ट्विट
सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ट्विटद्वारे हा वाद उघडकीस आणला आहे. विजय कुंभार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, रणबीर कपूरला कदाचित हे माहित नसेल की शीतल तेजवानी किती दिवाणी प्रकरणांमध्ये अडकली आहे. तिला भूमाफिया आणि राजकारण्यांचा भक्कम पाठिंबा आहे. शीतल तेजवानी ही जमीन गैरव्यवहारातील बडा मासा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.









