मुंबई – शिवसेना शिंदे गटाचे बुलडाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad)पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये (MLA hostel canteen)टॉवेल व बनियनवर त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी आमदार गायकवाड यांना अटक करण्याची मागणी होत आहे.
काल रात्री आमदार गायकवाड यांनी कॅन्टीनमधून डाळ-भात आणि पोळीचे जेवण मागवले होते. मात्र त्यांना मिळालेले जेवण निकृष्ट व शिळे असल्याचा आरोप करत त्यांनी थेट कॅन्टीनमध्ये जाऊन व्यवस्थापकाला जाब विचारला. यावेळी झालेल्या वादावादीत त्यांनी कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे व्हिडीओत दिसले. याशिवाय त्यांना कोणीही बिल भरू नका, असेही तिथे असलेल्या उपस्थितांना सांगितले.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार गायकवाड म्हणाले की, पहिला घास घेतल्यानंतर मला उलटी झाली. डाळीचा वास घेतला, तर आंबट वास आला. याआधीही दोन-तीन वेळा कॅन्टीनविषयी तक्रार मिळाली होती. त्यांना समजही दिली होती. आमदार असून मला असे निकृष्ट अन्न मिळाले, तर येथे ग्रामीण भागातून येणाऱ्या सामान्य माणसांचे काय होत असतील ?
या घटनेनंतर कॅन्टीनमधील साफसफाई सुरू झाल्याची माहिती आहे. या कॅन्टीन व्यवस्थापकाचे मनोरा आमदार निवासातील कंत्राट काढून घेतल्यानंतर त्याला आकाशवाणी आमदार निवासाचे कंत्राट दिले होते. त्याचे हेही कंत्राट २०१८ मध्ये संपले असून याठिकाणी बेकायदेशीरपणे कॅन्टीन चालवत असल्याची माहिती आहे. मात्र, मारहाण प्रकरणाला कलाटणी देण्यासाठी ही माहिती उघड करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असेही म्हटले जात आहे.
