Sudhir Mungantiwar Vs Devendra Fadnavis : विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या पार्शवभूमीवर मागच्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण चांगलंच तापलेले पाहायला मिळालं. यामध्ये महायुतीने घवघवीत यश देखील प्राप्त केलं. यात अनेक वाद विवाद सत्ताकारण देखील पाहायला मिळालं. पण यासगळ्या वादळातून जर काही टिकलं असेल तर ती म्हणजे फडणवीसांची सत्ता. पण या सत्तेसोबत आले ते अनेक वाद विवाद, पक्षा अंतर्गत नाराजी पण या सगळ्याला न जुमानता भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष ठरला.
क्रमांक एकचा हा पक्ष त्यांच्याच पक्षातील नेत्यांना खुश करायला कमी पडतोय का? मागच्या काही दिवसांपासून सुधीर मुनगंटीवार विरुद्ध फडणवीस यांच्यातील खटकेबाजी जनतेपासून लपून राहिलेली नाही. त्यामुळे क्रमांक एकचा पक्ष बनलेल्या भाजपात एकेकाळीचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्या बाबतीत जे घडले, तेच सध्या सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या बाबतीत होत आहे का? असे प्रश्न सध्या उपस्थित राहताना दिसत आहेत.
मुनगंटीवार स्वतःला एकनाथ खडसेंच्या भूमिकेत नेऊन स्वतःचा राजकीय तोटा करून घेत आहेत का? मागच्या काही महिन्यातील मुनगंटीवारांची पक्षविरोधी सततची बदलती भूमिका, आणि वरिष्ठांच्या विरोधात वक्तव्यं पाहिल्यानंतर भाजपा विरुद्ध मुनगंटीवार असे शीत युद्ध सुरु असल्याचे दिसून येते.
विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या यशाला कोणीच रोखू शकले नाही. मात्र भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूर जिल्ह्यात भाजपाचा हा विजय रोखण्यात काँग्रेसला यश आले. चंद्रपूर जिल्ह्यातील इतर नगरपरिषदांसह मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदारसंघातील मूल आणि बल्लारपूर या दोन नगरपरिषदांमध्येही भाजपाला हार पत्करावी लागली.
मूलमध्ये भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा जवळपास अडीच हजार मतांनी पराभूत झाला.तर; काँग्रेसच्या १८ नगरसेवकांच्या तुलनेत भाजपचे फक्त दोन नगरसेवक निवडून आले.अगदी तशीच परिस्थिती मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बल्लारपूरमध्ये निर्माण झाली. बल्लारपूरमध्ये भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवाराला अगदी काठावर अपयश आले. ३४ पैकी फक्त ७ जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आल्यामुळे मुनगंटीवार यांचा अनेक वर्षांचा यशाचा मनोरा ढासळला.
पक्ष नेतृत्वाच्या विरोधात टीका
चंद्रपुरातील पराभवानंतर मुनगंटीवार यांची तोफ विरोधकाऐवजी आपल्याच पक्षातील नेतृत्वाच्या विरोधात कडाडताना दिसली. चंद्रपूरसह मूल आणि बल्लारपूर मधील पराभवाचे तर्कशुद्ध विश्लेषण करताना मुनगंटीवार यांनी पक्षावर त्यांना दुर्बल केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. विधानसभा निकवडणुकीत सातव्यांदा जिंकल्यानंतरही यंदा त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवल्याचे शल्यही मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे बोलून दाखवले.
पण; सुधीर मुनगंटीवार एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी दुसऱ्या दिवशी देखील पुन्हा त्यांची नाराजी व्यक्त करून दाखवली. मुनगंटीवार यांनी भाजपमधील नाराजी नेत्यांची ते मूठ बांधणार असल्याचे राजकीय संकेत दिले. सुधीर मुनगंटीवारांची ही नाराजी भाजपच्या इतर नेत्यांनी वेळीच हेरली आणि सावधगिरीची प्रतिक्रिया दिली.
बावनकुळेंनी देखील यावर सावधगिरीचीच प्रतिक्रिया दिली. चंद्रपुरातील पराभवाबद्दल आम्ही आत्मचिंतन करू, तसेच आम्ही मुनगंटीवार यांच्यासोबत याबाबत बोलू. त्यांची भूमिका योग्य असली, तरी पराभवाचा थेट संबंध मंत्रिपद असणे किंवा नसणे याच्याशी जोडता येणार नाही असे बावनकुळे म्हणाले.
मुनगंटीवारांचा खडसे होतोय का?
मुनगंटीवार यांच्या अवतीभवती सध्या सुरु असलेल्या सर्व घडामोडी पाहता, २०१४ ते २०२१९ मध्ये जे एकनाथ खडसे यांच्या संदर्भात घडले, तेच आता सुधीर मुनगंटीवार यांच्या बाबत घडत आहे का अशी शंका राजकीय विश्लेषकांच्या मनात येत आहे. इच्छा नसून देखील लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या मुनगंटीवारांचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला होता.
मात्र त्यानंतर विधानसभेत मुनगंटीवार यांनी कमबॅक करत चंद्रपुरात भाजपला यश देखील मिळवून दिले होते. मात्र राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतरही मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातील स्थान मुकले. त्यानंतर सत्ताधारी भाजपमध्ये असून देखील मुनगंटीवार यांनी वारंवार भाजपावर टीकेचे सत्र सुरूच ठेवले.
त्यानंतर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुनगंटीवार पुन्हा त्याच रंगात आणि उत्साहात दिसले. कधी त्यांनी महायुती सरकारच्या नवख्या मंत्र्यांना नियमांच्या पेचात बांधले, तर कधी सभागृहात ज्येष्ठ मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित करत सरकारचीच कानउघाडणी केली. राज्यात गाजत असलेल्या बिबट्यांच्या प्रकरणी तर मुनगंटीवारांनी विद्यमान वनमंत्री आणि त्यांच्या विभागाचे अक्षरश धिंडवडे काढले असे म्हणायला देखील हरकत नाही. सुधीर मुनगंटीवार राज्यातील भाजपच्या अभ्यासू आणि विधिमंडळातील बारीक-सारीक नियमांची इत्यंभूत माहिती असलेल्या नेत्यानंमध्ये गणले जातात.
विधिमंडळातील त्यांची उपस्थिती भाजपच्या मोठ्या संख्येने निवडून आलेल्या नव्या आमदारांसाठी मोठे मार्गदर्शक ठरू शकते. मात्र मुनगंटीवार विधिमंडळाच्या आत असो किंवा बाहेर, ते वारंवार आपल्याच सरकारला टार्गेट करताना दिसतात. पण यावर त्यांनी अप्रत्यक्षपणे का होईना फडणवीसांना देखील लक्ष केले. अर्थात आता पर्यंतचा इतिहास पाहता फडणवीसांना नडलेले भले भले नेते पक्षाच्या बाहेर पडल्याचे दिसले.
याच दरम्यान, सुधीर मुनगंटीवार जरी नितीन गडकरी यांच्या गटातले मानले जात असले तरी त्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे राजकीय संबंध तितकेसे चांगले नाहीत हे वारंवार दिसून आले. २०१४ ते २०१९ या काळात सुधीर मुनगंटीवार फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री आणि वनमंत्री म्हणून काम पाहू लागले होते.
त्यानंतर सन २०१४ ते २०२१९ च्या काळात मुनगंटीवार हे फडणवीस सरकारमध्ये फक्त महत्वाच्या भूमिके पुरतेच मर्यादित राहिले नाहीत तर ते सरकार आणि पक्षाचे संकट मोचकही होते. त्याकाळात मुनगंटीवार यांना तुलनेनं ज्युनिअर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना देखील त्यांनी मोलाची साथ दिली होती. अनेक क्लिष्ट विषयांवर विरोधकांचे हल्ले देखील त्यांनी परतवून लावले.
नाराजीनाट्याची सुरवात नेमकी झाली कुठून?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा चंद्रपूर लोकसभेत दारुण पराभव झाला आणि यासाठी बऱ्याच अंशी सुधीर मुनगंटीवार यांना जबाबदार धरले गेले. त्यानंतर २०२१ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मुनगंटीवार यांना तुलनेने कमी महत्त्वाचं सांस्कृतिक खातं दिल गेलं.
मात्र तेव्हा देखील मुनगंटीवार यांची नाराजी समोर आली न्हवती पण आता त्यांची खरी नाराजी समोर आली ती २०२४ च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान. मला लोकसभा लढवायची नाही असं त्यांनी वारंवार आणि अगदी खुलेपणे सांगितले. त्यामुळे पक्षाच्या निर्णया विरोधातील त्यांचे हे वक्तव्य जोरदार चर्चेत आले.
या निवडणुकीत मुनगंटीवार यांचा मोठ्या फरकाने दारुण पराभव झाला. विशेष म्हणजे त्यांच्या स्वतःच्या बल्लारपूर मतदारसंघात देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
या सगळ्या दरम्यान किशोर जोरगेवार यांना भाजपात प्रवेश देण्यावरून देखील त्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वारंवार खटके उडाल्याचे लपून राहिले नाही. मुनगंटीवार यांनी थेट दिल्लीपर्यंत जात पक्ष प्रवेश रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र मुनगंटीवार हे किशोर जोरगेवार यांना भाजपात येण्यापासून रोखू शकले नाही हे अंतिम सत्य. आणि त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात जोरगेवार विरुद्ध मुनगंटीवार हा नवा वाद सुरु झाला. गेल्या काही दिवसांपासून मुनगंटीवारांची पक्षाबाबतची विरुद्ध भूमिका पाहता त्यांचा एकनाथ खडसे व्हायला वेळ लागणार नाही अशी चर्चा रंगताना दिसत आहे.
हे देखील वाचा –
Navneet Rana : महापालिका निवडणुकीत राजकीय गणितात धर्माचा खेळ? नवनीत राणाच ‘ते’ विधान चर्चेत









