मुंबई – लातूरमध्ये छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे(Vijay Ghatge) यांना खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare)यांच्यासमोर मारहाण केल्याप्रकरणी निलंबित झालेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) माजी प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी फक्त तीन आठवड्यांतच प्रदेश सरचिटणीसपदी (General Secretary) बढती दिली आहे.
विधिमंडळ अधिवेशन चालू असताना सभागृहात ऑनलाईन रमी (Online Rummy)खेळणारे तत्कालिन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याविरोधात छावाचे पदाधिकारी विजय घाटगे यांनी २० जुलै रोजी लातुरात सुनील तटकरेंसमोर पत्ते फेको आंदोलन केले होते. त्यावेळी सूरज चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घाटगे यांना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली होती. परंतु त्यांची तत्काळ सुटका करण्यात आली होती. राज्यभर संताप उसळल्याने २३ जुलैला चव्हाण यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र तीन आठवड्यांतच त्यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे छावा संघटनेत पुन्हा संतापाची लाट उसळली आहे. नांदेडमध्ये छावा संघटनेने अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन केले.
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे म्हणाले की, राज्यात शेतकऱ्यांच्या मुलावर हल्ला करणाऱ्या सूरज चव्हाणला प्रमोशन देण्यात आले आहे. सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरीविरोधी आहेत. अजित पवारांनी आम्हाला सांगितले होते की सूरज चव्हाणला पुन्हा पक्षात घेणार नाही. मात्र, आजच्या निर्णयावरून अजित पवारांचे पक्षात चालत नाही का, असा प्रश्न निर्माण होतो. आमच्या जखमा अजून ओल्या आहेत. या प्रकरणाला २० दिवसही झाले नाहीत आणि तुम्ही सूरज चव्हाणला हे पद दिले. याचा अर्थ असा की, शेतकरी मुलांना मारहाण करणाऱ्यांना पक्षात पाठिंबा दिला जातो. सुनील तटकरे यांनी जे केले त्याचे परिणाम त्यांना येत्या काळात भोगावे लागतील.