मराठी भाषेवरून राज ठाकरेंना थेट आव्हान देणारे सुशील केडिया कोण आहेत?

Susheel Kedia

Susheel Kedia | महाराष्ट्रात मराठी भाषेच्या मुद्यावरून राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारने हिंदी सक्ती (Hindi Compulsion) रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज (5 जुलै) वरळीतील एन.एस.सी.आय. डोम येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या हिंदी सक्ती रद्दच्या विजयी मेळावा पार पडणार आहे.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा-भाईंदर येथील एका स्वीट मार्ट मालकाला मराठी न बोलल्याने मारहाण केल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत. याचवेळी, शेअर मार्केट उद्योजक सुशील केडिया यांनी ‘एक्स’वर (ट्विट) मराठी न शिकण्याची प्रतिज्ञा घेतल्याची पोस्ट करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचले, ज्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

मराठी भाषेचा वाद

एका व्यापाऱ्याला मराठी न बोलण्याच्या कारणारवरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या पार्श्वभूमीवर सुशील केडिया यांनी ‘एक्स’वर लिहिले, “मी 30 वर्षांपासून मुंबईत राहतो, पण मला मराठी येत नाही. राज ठाकरे, तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी ठरवले आहे की, जोपर्यंत तुम्हाला मराठी माणसांची काळजी करण्याचे नाटक करण्याची परवानगी आहे, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. काय करणार आहेस, बोल?”

केडिया यांच्या या ट्विटनंतर हा मुद्दा अधिकच पेटला. अनेकांनी मुंबईत राहणाऱ्यांनी मराठी शिकणे आणि तिचा आदर करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

सुशील केडिया कोण आहेत?

सुशील केडिया हे ‘केडियोनॉमिक्स’ या सेबी-नोंदणीकृत ट्रेडिंग आणि सल्लागार फर्मचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. 25 वर्षांहून अधिक काळ राष्ट्रीय आणि जागतिक गुंतवणूक बँकांमध्ये आणि हेज फंडांमध्ये त्यांनी काम केले आहे.

केडिया यांच्याकडे 45 कंपन्यांमध्ये 3,103 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे शेअर्स आहेत. आर्थिक क्षेत्रातील त्यांचे विश्लेषण आणि समालोचन यामुळे ते प्रसिद्ध आहेत, पण मराठी भाषेवरील त्यांच्या विधानाने ते आता वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत.