Tejasvee Ghosalkar : आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये (भाजप) अधिकृत प्रवेश केला.
दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी दादर येथील वसंत स्मृती (भाजप कार्यालय) येथे मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले.
कोण आहेत तेजस्वी घोसाळकर?
तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत.
- राजकीय प्रवास: 2017 मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्या प्रभाग क्रमांक 1 मधून विजयी झाल्या होत्या.
- कौटुंबिक पार्श्वभूमी: त्या शिवसेनेचे माजी नगरसेवक दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत.
- दुःखद घटना: त्यांचे पती अभिषेक घोसाळकर, जे मुंबै बँकेचे संचालकही होते, त्यांची फेब्रुवारी 2024 मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती.
- चर्चेतील प्रवेश: पतीने मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची वर्णी लागल्यामुळेच त्या भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा तेव्हापासूनच सुरू झाली होती.
“हा निर्णय वेदनेतून घेतला आहे,” तेजस्वी झालेल्या भावूक
भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी समाजमाध्यमांवर एक भावूक पत्र लिहून शिवसैनिकांना आपल्या मनातील भावना सांगितल्या.
त्यांनी पत्रात म्हटले की, हा निर्णय ‘वेदनेतून’ घेतला आहे, पण माझ्या प्रामाणिकतेशी आणि आपल्या विश्वासावर कधीही तडा जाऊ देणार नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, पती अभिषेक यांच्या हत्येमुळे त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलले. दोन लहान मुले आणि लोकांची जबाबदारी पेलताना त्या अनेकदा कोसळल्या, पण तरीही त्यांनी स्वतःला सावरले.
भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, प्रभागात विकासाची कामं करण्यासाठी त्यांनी हा कठीण निर्णय घेतला आहे. मुलांचे भविष्य आणि विकासासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा
तेजस्वी घोसाळकर यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपली आणि प्रभागातील कामे पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच, पती अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोमार्फत (CBI) सुरू असलेला तपास संथ गतीने चालू आहे. हा तपास वेगाने होईल आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी भाजप व मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त केली.
हे देखील वाचा – Who is Nitin Nabin : अज्ञात नेतृत्वाचा उदय! भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बनलेले नितीन नबीन कोण आहेत?









