Tesla Factory At Satara | अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन (electric vehicle) कंपनी टेस्लाने (Tesla) महाराष्ट्रातील साताऱ्यात वाहनांचा सुटे भाग जोडणारा प्रकल्प (सीकेडी) उभारण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही महिन्यापासून कंपनी भारतात कर्मचारी भरती करत आहे. तसेच, मुंबई आणि दिल्लीत शोरूम देखील सुरू करण्याच्या तयारीत आहे.
आता कंपनी साताऱ्यात वाहनांचा सुटे भाग जोडणारा प्रकल्प (सीकेडी) उभारण्याचा विचार करत आहे. या योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक कारचे सुटे भाग भारतात आणून ते येथेच जोडले जातील. त्यामुळे उत्पादन खर्च आणि आयात शुल्क मोठ्या प्रमाणात कमी होईल.
या युनिटसाठी साताऱ्याच्या खंडाळा तालुक्यातील शिरवळ औद्योगिक वसाहतीतील तिसऱ्या टप्प्यात सुमारे 750 एकर जमिनीची पाहणी झाल्याची माहिती समोर आली आहे. बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, टेस्लाने या भूखंडांची पाहणी सुरू केली आहे, मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तरीही, या युनिटची प्रत्यक्ष उभारणी झाल्यास सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार असून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. मात्र, अद्याप कंपनीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिेली नाही.
याआधी टेस्लाने हैदराबादमधील मेघा इंजिनीयरिंगसोबत संयुक्त उद्योगकरण्याबाबत चर्चा केली होती, मात्र ती यशस्वी झाली नाही. त्यानंतर कंपनीने इतर काही भारतीय कंपन्यांशीही संयुक्त भागीदारीबाबत बोलणी सुरू केली आहे.
भारतातील टेस्लाचा प्रवेश 2026 च्या एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासाठी केंद्र सरकारने SMEC धोरणात बदल करण्याची तयारी दर्शवली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारावर चर्चा सुरू असून, यामध्ये गाड्यांच्या सुटे भागांवरील आयात शुल्क 0 ते 1 टक्क्यांपर्यंत ठेवण्याचा प्रस्ताव दिला गेला आहे. याच्या बदल्यात अमेरिका 25 टक्क्यांपर्यंतचा आयात शुल्क सवलत देऊ शकते.
टेस्ला कंपनीने मुंबईत शोरूमसाठी जागा निश्चित केली असून, 2025 मध्ये तिथून आयात गाड्यांची विक्री सुरू होणार आहे. त्यामुळे टेस्लाचा भारतातील उद्योगसंधी व रोजगार निर्मितीचा प्रवास अधिक वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे.