मुंबई – प्लास्टर ऑफ पॅरिस (POP)च्या उंच गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) नुकतीच परवानगी दिल्यामुळे माघी गणेशोत्सवात रखडलेल्या दोन महत्त्वाच्या मूर्तींचे अखेर २ ऑगस्ट रोजी विसर्जन होणार आहे. तब्बल साडेसहा महिन्यांपासून रखडलेल्या या मूर्तींच्या विसर्जनाचा मार्ग मोकळा झाला असून, संबंधित गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कांदिवलीतील डहाणूकरवाडीचा श्री आणि चारकोपचा राजा या दोन गणेश मंडळांच्या उंच पीओपी मूर्तींचे विसर्जन अजून झालेले नव्हते. पालिकेने कृत्रिम तलावात (artificial)विसर्जनाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. मात्र दोन्ही मंडळांनी कृत्रिम तलावातील विसर्जनास नकार दिला होता. यामुळे हे विसर्जन सहा महिन्यांपासून प्रलंबित होते. या पार्श्वभूमीवर ३० जानेवारी २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने पीओपी मूर्तींच्या नैसर्गिक जलस्रोतांतील विसर्जनावर बंदी घातली होती. न्यायालयाने राज्य सरकार, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि मुंबई महापालिकेला याबाबत आदेशही दिले होते. त्यामुळे माघी गणेशोत्सवात अनेक मंडळांनी मूर्ती विसर्जित न करता न्यायालयीन निर्णयाची वाट पाहिली. मात्र आता न्यायालयाने पीओपीच्या उंच मूर्तींना नैसर्गिक जलस्रोतात विसर्जनाची मुभा दिल्याने रखडलेली प्रक्रिया मार्गी लागली आहे. चारकोपचा राजा आणि डहाणूकरवाडीचा श्री या मंडळांनी २ ऑगस्ट रोजी मूर्ती विसर्जन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती चारकोपचा राजा मंडळाने दिली.