मुंबईत उबर शटल, सिटीफ्लोला चाप! विना परवाना सेवा देणाऱ्या बस ऑपरेटरवर कारवाई होणार

Uber Shuttle Aggregator Ban

Uber Shuttle Aggregator Ban | महाराष्ट्र सरकारने मुंबईतील उबर शटल (Uber Shuttle), सिटीफ्लो आणि इतर ॲप-आधारित बस सेवांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी याबाबत घोषणा केली असून, या कंपन्यांनी परवाने न घेतल्याने कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे मुंबई महानगरातील हजारो प्रवासी प्रभावित होणार असून, उबर शटल सेवा 11 जुलैपासून विस्कळीत झाली आहे आणि 12 जुलैपासून पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे.

सरनाईक यांनी सांगितले की, बेकायदेशीरपणे चालणाऱ्या या बस सेवांवर त्वरित कारवाई होईल. याशिवाय, बाईक टॅक्सी आणि कारवाई न करणाऱ्या वरिष्ठ आरटीओ अधिकाऱ्यांवरही कठोर पावले उचलली जातील. मंत्रालयाजवळील रॅपिडो बाईक टॅक्सी पकडल्याची नुकतीच घटना त्यांनी सांगितली.

सरनाईक म्हणाले की, “आरटीओ अधिकाऱ्यांनी नोटिसा पाठवून कारवाई करायला हवी होती. जर ही सेवा प्रवाशांसाठी फायदेशीर असेल, तर धोरण बनवू, पण बेकायदेशीर ऑपरेशन्स थांबवले पाहिजेत.” सिटीफ्लोने परवान्यासाठी अर्ज केल्याचे सांगितले, तर उबरने मुंबईत पायलट प्रकल्प सुरू असल्याचे स्पष्ट केले.

प्रवाशांची गैरसोय

मुंबईत 450 हून अधिक बसेस या सेवांखाली चालतात. एसी बेस्ट बसेसच्या अभावात लांब पल्ल्याचे प्रवासी या शटलवर अवलंबून आहेत. सेवा बंद झाल्यास मोठी अडचण निर्माण होईल, अशी चिंता व्यक्त होत आहे.