मुंबई- सत्ताधारी पक्षांमधील कलंकित, भ्रष्टाचारी आणि असंवेदनशील मंत्री व आमदारांना तात्काळ बडतर्फ करा, अशी मागणी राज्यपालांकडे (Governor) केल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते उबाठाचे (UBT) अंबादास दानवे (Ambadas Danve)यांनी सांगितले. उबाठा नेत्यांनी आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन (Governor C.P. Radhakrishnan) यांची भेट घेऊन त्यांना या मागणीचे निवेदन दिले. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की सरकार त्यांच्या नेत्यांना पाठीशी घालत असून राज्यपाल कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. मात्र राज्यपालांकडून न्याय मिळाला नाही तर आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ.
ते म्हणाले की राज्यपाल महोदयांची आमच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. राज्यातील मंत्र्यांचे भ्रष्टाचारी वर्तन आहे. विधानसभेतील आमदारांचे देखील वर्तन कलंकित करणारे आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या विषयी गैर-उद्गार काढले. हेच मंत्री लोकशाहीच्या मंदिरामध्ये रम्मी खेळताना आढळले. दुसरीकडे राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या आईच्या नावे डान्सबार आहे. या डान्सबारमधून २२ बारबालांना पकडले. राज्याचे गृह राज्यमंत्रीच अनैतिक डान्सबार चालवत आहेत. तरी देखील राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री झोपलेले आहेत का? असा प्रश्न दानवेंनी यावेळी उपस्थित केला. हनी ट्रॅप (Honey Trap)प्रकरणात देखील काही मंत्र्यांचा समावेश आहे. या प्रकरणी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राजीनामा द्यावा. गिरीश महाजन हाॅटेल ट्रायडंट मध्ये हनी ट्रॅपचा आरोप असलेल्या प्रफुल्ल लोढाला भेटायला का गेले होते ? संजय शिरसाटांच्या घरी नोटांची बॅग मिळाली , विट्स हाॅटेल खरेदीत भ्रष्टाचार केला , गोपीचंद पडळकर म्हणाले ख्रिश्चनांचा सैराट करा , संजय गायकवाड यांनी वेटरला मारहाण केली या संदर्भात सरकार काही ऐकत नाही. सरकार या चुकीच्या गोष्टींचे समर्थन करत आहे. त्यामुळे न्याय मागण्यासाठी राज्यपालांकडे आलो होतो. राज्यपाल याप्रकरणी न्याय देतील अशी अपेक्षा आहे. मात्र त्यांनी न्याय दिला नाही तर आम्ही जनतेच्या दरबारात जाणार आहोत, असे दानवे म्हणाले. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, महायुतीमधील मंत्र्यांचे क्रमाने आम्ही राजीनामे मागितले आहेत . पहिले योगेश कदम, गिरीष महाजन, संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, संदिपान भूमरे , नितेश राणे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आज आम्ही राज्यपालांची भेट घेतली. इतकेच नाही तर त्यांच्याकडे पेन ड्राईव्ह देखील दिलेला आहे. परब यांनी योगेश कदम यांच्या विरोधात पुरावे राज्यपाल यांना दिले .