Home / महाराष्ट्र / मुंबईकरांसाठी गुड न्यूज! विक्रोळी उड्डाणपूल आजपासून खुला; तीन पक्षांचे श्रेयाचे सोहळे

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! विक्रोळी उड्डाणपूल आजपासून खुला; तीन पक्षांचे श्रेयाचे सोहळे

मुंबई – पूर्व आणि पश्चिम (East and West) उपनगरांना जोडणारा विक्रोळी उड्डाणपूल (Vikhroli Flyover) अखेर आज नागरिकांसाठी खुला करण्यात आला. आज सायंकाळी चार वाजल्यापासून वाहतुकीसाठी खुला झालेल्या या पुलामुळे प्रवासात सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे. मात्र या उड्डाणपुलावरुन श्रेयवादाची लढाई सुरु झाली. भाजपा (BJP), शिंदे गट (SHINDE GAT) आणि उबाठा(UBT) या तिन्ही गटांनी बॅनरबाजी करून आणि मोर्चे काढून हे काम आपण केल्याचा दावा केला.

मुख्यमंत्री फडणवीस (CM Fadanvis) यांनी काल एक्स (X Post) वर म्हटले की मी मुख्यमंत्री असताना २०१८ मध्ये या कामाचे आदेश दिले होते. १०४.७७ कोटी रुपये त्यावर खर्च करण्यात आला. येणाऱ्या काळात पाऊस लक्षात घेता मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये, म्हणून हा पूल १४ जून रोजी दुपारी ४ वाजेपासून वाहतुकीसाठी खुला करावा, असे निर्देश आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त आणि पोलिसांना (Police) दिले आहेत. त्यानंतर आज सकाळी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या पुलाचे येऊन उद्घाटन केले. नंतर भाजपा कार्यकर्त्यांनी पुलावर रॅली काढत घोषणाबाजी केली. याचवेळी उबाठा गटाने देखील दुसऱ्या बाजूने आपला उद्घाटन सोहळा पार पाडला.

शिंदे गटाच्या उद्घाटनाबाबत विचारले असता भाजपाचे नेते दीपक दळवी यांनी थेट उत्तर देणे टाळले. त्यांनी म्हटले की , आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. हा पूल म्हणजे फडणवीसांनी विक्रोळी, भांडूप, कांजूर भागातील नागरिकांना दिलेली भेट आहे. आम्ही त्यांचे आभार मानण्यासाठी येथे जमलो आहोत.

उबाठा गटाच्या हस्तेही उद्घाटन झाल्याबद्दल विचारले असता दळवी म्हणाले, त्यांचा या प्रकल्पाशी काही संबंधच नाही. २०१८ मध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना या पुलाच्या कामाला मान्यता दिली होती आणि आता त्यांच्या आदेशानुसार तो नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. श्रेय घेणे हाच त्यांचा नेहमीचा उद्योग आहे.

विक्रोळी पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग आणि विक्रोळी पूर्वेकडील पूर्व द्रुतगती मार्ग यांना जोडणाऱ्या या पुलामुळे पवईकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा फायदा होणार आहे. वाहनांची वेळ व इंधनात बचत होणार असून घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग रेल्वे स्थानकांपासून जवळील परिसरातील नागरिकांनाही याचा लाभ होणार आहे.