Vinod Ghosalkar : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणातील बदल प्रकर्षाने जाणवतात. अशातच आज उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तथा माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून काढता पाय घेतला आहे. आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पक्षात जोरदार प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाशी एकनिष्ठ असलेल्या उत्तर मुंबईतील घोसाळकर घरात आज अधिकृतपणे राजकीय फूट पडली असल्याचे दिसून आले.
भाजपा पक्ष प्रवेशानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. माझ्या प्रभागात विकासाची कामे करण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्या म्हणतात. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माझी सगळी कामे होतील, अशी मी अपेक्षा करते, असे देखील तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या. मात्र त्या जरी भाजपात गेल्या असल्या तरी त्यांचे सासरे विनोद घोसाळकर मात्र अजूनही शिवसेनेतच आहेत.
या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांना यावेळी अश्रू अनावर झाले.दिवंगत नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी आज भाजपात पक्षप्रवेश केला. आपल्या पोटच्या मुलाच्या निधनानंतर सूनबाईंनी विरोधी पक्षात प्रवेश केल्याने ज्येष्ठ शिवसैनिक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांना मात्र आपले अश्रू अनावर झाले. ते म्हणतात “अभिषेक असता तर हा प्रश्नच उद्भवलाच नसता. मुलाचे आपण हक्काने कान धरू शकतो, पण सूनबाईंचे कान कसे धरणार?” अशा भावनिक शब्दांत त्यांनी आपली हतबलता व्यक्त केली.
सूनबाईंच्या भाजप प्रवेशावर बोलताना विनोद घोसाळकर यांचा कंठ दाटून आलेला दिसला. ते म्हणाले, “काल संध्याकाळी पत्नी, दोन्ही सुना आणि मी आम्ही सगळे एकत्र बसलो होतो. तेव्हा तेजस्वीने मला ‘डॅडी, मी असा निर्णय घेत आहे’ असे सांगितले. एक कुटुंबप्रमुख म्हणून मला जे समजवायचे होते, ते मी तिला समजावले. पण आपण याबाबत कोणावर दबाव आणू शकत नाही. ती स्वतंत्र व्यक्ती आहे आणि तिला तिचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण अभिषेक असता तर हे घडले नसते, मुलगा आणि सून यात फरक असतोच ना…” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
घरात फूट पडली असली तरी आपली निष्ठा ‘मातोश्री’शीच असल्याचे विनोद घोसाळकर यांनी यादरम्यान स्पष्ट केले. “तेजस्वीने निर्णय सांगितल्यानंतर मी तात्काळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना याबाबत कल्पना दिली. ती भाजपमध्ये गेली असली तरी मी आजही शिवसेनेतच आहे, बाळासाहेबांनी सत्तेवर लाथ मारायला शिकवले आहे, आम्ही सत्तेसाठी लाचार होणारी लोक नाही,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरी कौटुंबिक नाते जपणे भाग असल्याचे ते म्हणाले “आम्ही आजही एकाच घरात राहतो. माझी नातवंडे देखील तिथेच राहतात. त्यांच्यापासून मी कधीच दूर जाऊ शकत नाही. आता एकाच घरात दोन पक्ष ही संस्कृती माझ्याही वाट्याला आली आहे, हे सत्य आता स्वीकारावे लागेल,” अशी खंत देखील त्यांनी बोलून दाखवली.
हे देखील वाचा – High-Protein Winter Soups : रात्रीच्या जेवणासाठी उच्च-प्रथिनेयुक्त हिवाळ्यातील सूप









